‘या’ शहरात भर उन्हाळ्यात पाणी टंचाईची धग तीव्र ; महिलांची पाण्यासाठी तडफड

‘या’ शहरात भर उन्हाळ्यात पाणी टंचाईची धग तीव्र ; महिलांची पाण्यासाठी तडफड
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : आरमोरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत मोठया प्रमाणात गाळ साचल्याने शहरातील पाणीपुरवठा मागील पाच दिवसापासून ठप्प पडलेला आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे पाणीपुरवठा योजना शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी असमर्थ ठरत असल्याने भर उन्हाळ्यात पाणी टंचाईची धग जाणवत आहे. परिणामी पाण्यासाठी महिलांची तडफड सुरु आहे. विशेष म्हणजे, शहरातील विविध वार्डांमध्ये टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, काही भागात टँकरचे दर्शनच होत नसल्याने निम्मे शहर तहानलेलेच असते.
आरमोरी शहराला नळाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी शहराचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. एका भागामध्ये सकाळी तर दुसर्‍या भागामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी अशाप्रकारे एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. यामुळे दररोज शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. आरमोरी शहराला वैनगंगा नदीवरील पाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. वैनगंगा नदीवरील लाईन मागील अनेक वर्षांपासून सिंगल फेसद्वारा चालत आहे. त्याचप्रमाणे वीज वितरण कार्यालयातून नेहमीच विजेचा लपंडाव होत असल्याने जलकुंभात पूर्णपणे पाण्याचा साठा होत नाही. भर उन्हाळ्यात विहिरीत गाळ साचल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. जोपर्यंत विहिरीतील गाळेचा उपसा होत नाही तोपर्यंत पाणीपुरवठा चालू होणार नसल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे नगर परिषदेने कळविले आहे. मात्र नगरपरिषद अर्ध्या शहरात टँकरने पाणीपुरवठा करीत असून अर्ध्या शहरात टँकरचे दर्शन सुद्धा होत नसल्याचे बोलले जात आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा केला जात नाही. महिनाभऱ्यातून केवळ आठ दिवस पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना विहिरी, हातपंप यासारख्या साधनांवर वर्षभर पाण्यासाठी धाव घ्यावी लागते. हातपंपावर महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने अनेकदा वादावादीचे प्रसंग निर्माण होतात.त्यामुळे नागरिकांनी नगर परिषदेच्या कार्यप्रणाली बद्दल रोष व्यक्त केला आहे. नगरपरिषदेने तत्काळ नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून सकाळ-संध्याकाळ नागरिकांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या काही वर्षापासून पाणीटंचाईची समस्या सहन केलेल्या नागरिकांची सहनशीलता संपली असल्याने प्रसंगी नागरिकांच्या असंतोषाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अल्पावधीतच योजनेला लागले ग्रहण
पूर्वी पाणी पुरवठा करण्यासाठी गाढवी नदीवर पाण्याचे जलकुंभ बांधण्यात आले होते. परंतु शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन 2007 नंतर वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर झाली व ऑगस्ट 2008 मध्ये ग्रामसभेने या योजनेला मंजुरी प्रदान केली होती. तत्कालिन वित्तमंत्र्यांनी सदर योजनेसाठी 5 कोटी 60 लाख रुपये असे 90 टक्के शासनाचे व 10 टक्के लोकवर्गणी जमा करुन वैनगंगा नदीवर जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. वैनगंगा नदीवर नवीन जलकुंभ बांधकाम करण्यात आल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणार नाही याची जाणीव निर्माण झाली होती. मात्र योजना सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच या योजनेला ग्रहण लागले .