तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर नीलगायीचा हल्ला

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर नीलगायीचा हल्ला
– सोनेरांगी नियतक्षेत्रातील घटना
GADCHIROLI TODAY
आरमोरी : तेंदूपत्ता संकलनासाठी पतीसोबत जंगलपरिसरात गेलेल्या महिलेला एका नीलगायीने धडक देवून जखमी केल्याची घटना गुरुवारला सोनेरांगी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 309 मध्ये घडली. रत्नमाला गोपाल गेडाम रा. मोहझरी असे जखमी महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरु असल्याने तेंदू मजूर सकाळीच तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात जात असतात. दररोजप्रमाणे मोहझरी येथील गोपाल गेडाम व त्यांची पत्नी सकाळी 7 वाजता सोनेरांगी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 309 मध्ये तेंदूपाने तोडण्यासाठी गेले होते. दरम्यान पाने तोडत असताना अचानक नीलगायींचा कळप त्यांच्या दिशेने पळत आला. पती गोपाल गेडाम हे कळपाला पाहून बाजुला झाले. मात्र पत्नी रत्नामाला गेडाम दुस-या बाजुला असल्याने एका नीलगायीने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्या खाली पडून बेशुद्ध झाल्या. गोपाल गेडाम यांनी पत्नीला पाणी पाजून सोनेरांगी-देलनवाडी मार्गावर आणले. याचवेळेस देलनवाडीकडे जाणा-या एका दुचाकीस्वाराला थांबवून तिला प्राथमिक आरोग्य केंद्र देलनवाडी येथे उपचारासाठी नेले. या हल्ल्यात रत्नमालाच्या डाव्या डोळ्याजवळ मार लागला. प्राथमिक उपचारानंतर तिला घरी आणण्यात आले. घटनेची माहिती देलनवाडीचे क्षेत्र सहाय्यक यांना देण्यात आली. त्यांनी पंचासमक्ष घटनास्थळावर जावून पंचनामा केला. रत्नमाला गेडाम यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना वनविभागाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पती गोपाल गेडाम व ग्रामस्थांनी केली आहे.