CRIME ‘कानून के हाथ लंबे होते है’ ही म्हण ठरली खरी ; भुतानेच हत्या केल्याचा ग्रामस्थांचा भ्रम पोलिसांनी केला दूर

CRIME ‘कानून के हाथ लंबे होते है’ ही म्हण ठरली खरी ; भुतानेच हत्या केल्याचा ग्रामस्थांचा भ्रम पोलिसांनी केला दूर
-महिनाभरानंतर आरोपीला ठोकल्या बेड्या
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलिस स्टेशनंतर्गत येणा-या मलमपुदूपूर येथे एका महिलेची हत्त्या चक्क भुतानेच केल्याचा भ्रम नातेवाईक व गावकऱ्यांमध्ये पसरल्याने पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला. मात्र पोलिसांनी कोणतेही पुरावे नसताना मोठ्या शिताफीने प्रकरणाचा तपास करून महिनाभरात आरोपीला अटक करून ग्रामस्थांचा भुताचा भ्रम दूर केला. गुड्डू गावडे असे आरोपीचे नाव असून तो मृत महिलेचा नातेवाईकच निघाला.
एक महिन्यापूर्वी मलमपुदुपुर येथील शेतामध्ये कल्पना विलास कोठारे हिने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. याबाबत लाहेरी पोलिस स्टेशनमध्ये कल्पना हिने स्वतःच्या आजाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याबाबत तिचा पती विलास कोठारे याने सांगितले होते. मात्र पोलिसांना ही आत्महत्या नसून कुणीतरी गळा दाबून तिचा खून केल्याचा संशय आल्याने गुन्हा नोंद केला. परंतु कुठलेही पुरावे पोलिसांना मिळत नव्हते. पोलिसांनी नातेवाईकांकडे व गावकऱ्यांकडे सदर प्रकरणाबाबत विचारणा केली असता, सदर खून हा विलास कोठारे यांची पहिल्या पत्नीच्या भुताने कल्पनाच्या अंगात येऊन तिचा खून केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिस आणखीनच बुचकाळ्यात पडले होते.
यादरम्यान, खून प्रकरणात धागेदोरे गवसत गेल्याने कल्पना कोठारेचा मारेकरी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आरोपी गुड्डू गावडे हा मृत महिलेचा नातेवाईकच निघाला. तब्बल एक महिन्याच्या तपासानंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आल्याने ‘कानून के हाथ लंबे होते है’ ही म्हण खरी ठरली. कल्पना कोठारे खून प्रकरणात अटकेत असलेल्या गुड्डू गावडे याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तपास केला असता, गुड्डू हा कल्पना कोठारे यांच्या मालकीच्या मलमपुदूपूर येथील पोल्ट्री फार्म आणि राईस मिलमध्ये काम करायचा. गुड्डू हा कल्पनाचा दीराचा साळभाऊ असल्याने कल्पनाने त्याला गेल्या 3 वर्षांपासून कामावर ठेवले होते. मात्र गुड्डूच्या कामावर नाराज असल्याने कल्पना त्याच्यावर सतत ओरडायची. तसेच तिची बहीणही घरातील कामांबाबत गुड्डूवर रागावत होती. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या गुड्डूने कल्पना रात्री बाथरूममध्ये गेली असता, तिचा गळा आवळून खून केला. याबाबत कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने शेताच्या आवारात मृतदेह नेऊन दोरीच्या सहाय्याने झाडाला लटकवले. या प्रकरणाचा अधिक तपास लाहेरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन सरकटे करीत आहेत.