समाजकार्य पदवीधारक विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करा : विद्यार्थी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

समाजकार्य पदवीधारक विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करा : विद्यार्थी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : समाज कल्याण सहाय्यक आयुक्त गट अ आणि समाज कल्याण अधिकारी गट ब या पदासाठी अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणींचे त्वरित निराकरण करून समाजकार्य पदवीधारक विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी समाजकार्य विद्यार्थी संघटनेने केली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच प्रसिद्धीस दिलेल्या जाहिरातीनुसार सहाय्यक आयुक्त गट अ या पदासाठी समाजकार्य पदवीधरांचा अर्ज योग्य पात्रता नाही असे दर्शवून अस्वीकृत केला जात आहे. वर्ग अ च्या पदाकरीता समाजकार्य पदवी ( bsw) यांना जाणीवपूर्वक डावलून इतर शाखेच्या पदवीधारकांना संधी दिली जात आहे. मात्र, इतर पदवी घेऊन समाजकार्याची पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज स्वीकारला जातो आहे. हा तांत्रिक भेद आहे की आयोगाचा दुजाभाव हे समजायला मार्ग नाही. यामुळे समाजकार्याचे पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या व या जागेसाठी अभ्यासक्रमाच्या रचनेनुसार अधिक पात्र असणाऱ्या राज्यभरातील समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि सामाजिक न्याय विभाग यांना मेल, निवेदने पाठवून आपला रोष व्यक्त केला आहे.
समाजकल्याण अधिकारी गट ब पदासाठी केवळ बीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यू पदवीधारकांनाच घ्यावे असे स्पष्ट सेवा प्रवेश नियम १९६४ १९८० असताना अर्ज भरताना अनुभव नसेल तर अर्ज सादर होत नाही. तसेच इतर पदवीधरांना क्षेत्रकार्य, गटकार्य, समुदाय विकास, दुर्बल घटक अभ्यास, सामाजिक समस्या व त्या सोडवण्याच्या पद्धती यांचा अभ्यास नसतानाही त्यांना अर्ज करण्यासाठी संधी दिली जाणे गैर आहे. समाजकार्याच्या व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित पदांची कर्तव्ये निगडित असल्याने एम.एस.डब्ल्यू च्या विद्यार्थ्यांचा या जागेसाठी विचार व्हायचा. मात्र, आता वस्तूस्थिती नाकारून शासन प्रशासन समाजकार्य पदवी धारकांवर अन्याय करत आहे. हा अन्याय दूर करावा, अन्यथा तीव्र संघर्ष छेडण्याचा इशाराही समाजकार्य पदवीधर विद्यार्थी संघटनेचे वतीने देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी नितेश दाकोटे, विजय सिडाम, आकाश अंबोरकर, आकाश मेश्राम, प्रमोद गुरणुले, मुकेश भोयर, धीरज सेलोटे, आशिष म्हशाखेत्री, अचुत बटे आदी उपस्थित होते.