3 हजार 968 विद्युत ग्राहकांची बत्ती गुल ; गडचिरोलीत तब्बल 168 कोटी रुपयाची थकबाकी

3 हजार 968 विद्युत ग्राहकांची बत्ती गुल ; गडचिरोलीत तब्बल 168 कोटी रुपयाची थकबाकी

-वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी, अधिकारी मैदानात
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : चंद्रपूर परिमंडळातील गडचिरोली जिल्ह्यात वीजेचा वापर करणाऱ्या सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडे महावितरणची तब्बल 168 कोटी रुपयाची थकबाकी आहे. त्यामुळे वसुलीसाठी महावितरण विशेष पथक मैदानात उतरले आहेत. विशेष म्हणजे, याअंतर्गत मार्च व एप्रिल या दोनच महिन्यात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात एकूण 3 हजार 968 थकबाकीदारांचा वीज पुरवठा तात्पुरता वा कायमस्वरूपी खंडीत करण्यात आला आहे.
चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्याचा समावेश आहे. दोन्ही जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यीक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनीक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी तब्बल 486 कोटींच्या घरात गेली आहे. यात जिल्ह्यातील वीज ग्राहकांवर तब्बल 168 कोटी 95 लाखाची थकबाकी असतांना शेतक-यांच्या कृषीपंपाची थकबाकी 91 कोटी 90 लाखाच्या घरात पोहचली आहे. तर घरगुती ग्राहकांची थकबाकी 11 कोटी 24 लाख रुपये, वाणिज्यिक 2 कोटी 11 लाख, औद्योगिक 96 लाख, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा 45 लाख, सरकारी कार्यालये व ईतर ग्राहकांची थकबाकी 2 कोटी 49 लाख (सरकारी कार्यालये- 99 लाख) ग्रामीण व शहरी पथदिव्यांची थकबाकी 59 कोटी 88 लाख एवढी आहे. थकबाकीचे वाढते डोंगर लक्षात घेता ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांवर बिल वसुलीचा ताण वाढला आहे. वसुलीसाठी कर्मचारी व अधिकारी मैदानात उतरले आहेत.
महावितरण पथकाद्वारे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत ग्राहकांकडे वीज पुरवठा खंडीत केला असतांनाही क्रॉस व्हेरिफिकेशन दरम्यान संबंधित ग्राहक बेकायदेशीर वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशांना दंड व वीज चोरीचे बिल देण्यात आले आहे. सदर दंड न भरल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. महावितरणद्वांरा वीज बिलांचा भरणा करण्यासाठी ग्राहकांना पर्यावरणपुरक ऑनलाईन पेमेंट, मोबाईल अॅप, गुगल पे, पेटीएम या यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्राहकांचा या सुविधांना उत्तम प्रतिसादही लाभत आहे. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीज ग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल अॅप किंवा इतर ऑनलाईन पर्यांयाद्वारे वीज बिलांचा भरणा करून सहकार्य करावे. असे आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.