…अन्यथा कोनसरी परीसरातील नागरिक छेडणार आंदोलन

GADCHIROLI TODAY

– जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गडचिरोली : कोनसरी येथील लोह खनिजावर आधारित उद्योग प्रकल्पात कोनसरी परिसरातील स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य देण्यात यावे व अन्यायग्रस्त शेत जमीन मालकांना न्याय देण्यात यावा, या मागण्यांकडे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केल्याने कोनसरी परीसरातील स्थानिकांनी 3 जून रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांना सादर करण्यात आले.
चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील लॉईड्स मेटल्स एनर्जी लिमिटेडच्या लोहखनिज प्रकल्पात स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य देणार असल्याची हमी कंपनी प्रशासनाने दिली होती. यामुळे कोनसरी परिसरातील आष्टी, अनखोडा, उमरी, चंदनखेडी, कडोली, जैरामपुर, मुधोली, रामपूर, सोमणपल्ली, रामकृष्णपुर, येनापूर, लक्ष्मणपुर धर्मपुर, बहादूर, गणपुर, इल्लुर, ठाकरी, मार्कंडा कंसोबा व परिसरातील गावातील अनेक आयटीआय व ईतर बेरोजगार युवकांमध्ये आशेचे किरण निर्माण झाले होते. परंतू, प्रत्यक्षात मात्र परिसरातील बेरोजगार युवकांना भरतीत कुठल्याही प्रकारचे प्राधान्य न देता बाहेर जिल्ह्यातील व राज्यातील कामगारांना रोजगार दिल्या जात आहे. ही स्थानिक जनतेची दिशाभूल असून याविरोधात स्थानिक बेरोजगार युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. दिशाभूल व फसवणूक करुन जमीन अधिग्रहण करू नये तसेच स्थानिक युवकांना रोजगार देण्याच्या हमीचे कंपनी प्रशासनाने पालन करून परीसरातील स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य द्यावे, लोहखनिजाची अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात यावा, या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. यासंबंधीचे निवेदन अनखोडा येथील उपसरपंच वसंत चौधरी, छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टीचे अध्यक्ष पवन रामगिरकर, सचिव संदिप तीवाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नेमाजी घोगरे, कढोलीचे सरपंच जितेंद्र हुलके, जैरामपुरचे माजी उपसरपंच हरेश नीखाडे, उमरीचे राहुल कुमरे यांनी उपजिल्हाधिकारी शेडगे यांना सादर केले.