डोंगरगाव-बेडगाव घाटावर अनियंत्रित ट्रकने दुचाकीला चिरडले

GADCHIROLI TODAY

कोरची : तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या डोंगरगाव ते बेडगाव घाटात एका भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले. यात दुचाकीचा पुरता चेंदामेंदा झाला. मात्र, या घटनेत सुदैवाने दुचाकीस्वार थोडक्यात बचावले. कोरची येथील पार्वताबाई विद्यालयातील लिपीक श्यामराव उंदिरवाडे व याच शाळेतील सहाय्यक शिक्षक जिवन भैसारे हे दुचाकीने गडचिरोली येथे वेतनाचे बिल सादर करण्यासाठी आज मंगळवारी सकाळी निघाले होते. बेडगाव पासून ७ किमी अंतरावर असलेल्या घाटातील चढावर एक ट्रकवर चढत होते. त्याचवेळी विरूध्द दिशेने एक ट्रक खाली येत होते. उंदिरवाडे व भैसारे यांची दुचाकी वर चढणाºया ट्रकच्या मागे होती. त्याचदरम्यान वर चढणारा ट्रक अचानक मागे येऊ लागला. ही बाब लक्षात येताच जिवन भैसारे व श्यामराव उंदिरवाडे यांनी दुचाकीवरून उडी घेतली. त्यामुळे दोघांचेही प्राण वाचले. मात्र यामध्ये दुचाकीचा पुरता चेंदामेंदा झाला. विशेष म्हणजे ५ एप्रिल २०२३ रोजी याच ठिकाणी घडलेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीररित्या जखमी झाला होता.