चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडणार ; ‘या’ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5 किमी अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजमध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करुन सर्व 38 दरवाजे 1 जून ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झालेले आहे. सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीचे वरचे बाजुस 4 किमी वर आहे. या बॅरेजची एकुण लांबी 691 मी. असून 15.00 मीटर लांब X 9.00 मी. उंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत. 15 ऑक्टोंबर 2022 पासून सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. अशातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जून पासुन सुरु होत आहे. बॅरेजमध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करुन सर्व उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे वाढीव पाणी पातळीमुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून नदी लगतच्या गावातील नागरिकांनी काठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतांमध्ये कामे करतांना सतर्क राहावे. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरु नदीवर आंघोळ करतांना, मासेमारी करणारे, नदीघाटातून रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. असे लघु पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
२१ गावांना धोका
चिचडोह बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार असून गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठावरील २१ गावांना धोका होण्याची शक्यता आहे. या गावांमध्ये चामोर्शी तालुक्यातील चामोर्शी, कुरुड, रामपूर, विसापूर, निमगाव, खोर्डा, हिवरगाव, तळोधी मोकासा, कुनघाडा, नवेगाव, आमगाव माल, दर्शनी माल, येवली, मार्कंडा, घारगाव, फराडा, डोटकुली तसेच गडचिरोली तालुक्यातील डोंगरगाव बु, शिवणी, मूडझा, पुलखल या गावांचा समावेश आहे.