ग्रामपंचायत प्रशासनाने चोरुन केला विजेचा वापर ! ; महावितरणच्या धाडीत प्रकरण उजेडात

GADCHIROLI TODAY

धानोरा : तालुक्यातील चिंचोली गट ग्रामपंचायतने विद्यूत बिलाचा भरणा न केल्याने महावितरण कंपनीद्वारे ग्रामपंचायत कार्यालयाची वीज कापण्यात आली. मात्र, त्यानंतरही ग्रामपंचायत प्रशासनाने चोरुन विजेचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार 25 मे रोजी महावितरण कपंनीने धाड टाकीत उघडकीस आणला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गट ग्रामपंचायत चिंचोली प्रशासनाने कार्यालयीन विद्यूत बिल न भरल्याने महावितरणने विद्यूत प्रवाह खंडीत करीत नियमानुसार थकित देयके भरण्याचे आदेश निर्गमित केले होते. मात्र ग्रापं प्रशासनाने बिलाचा भरणा केलेला नाही. असे असतांनाही ग्रापं कार्यालयातील पंखे, कुलर आदींसह विद्यूतवर चालणारे इतर उपकरणे नियमित चालू होते. सदर प्रकार मागील दीड ते दोन वर्षापासून सुरुच होता. याची माहिती महावितरण कार्यालय धानोरा यांना प्राप्त होताच पथकाने गुरुवारी सकाळी 11 वाजता थेट चिंचोली ग्रापं कार्यालयावर धाड टाकली. यावेळी तत्काळ विद्यूत पुरवठा बंद करीत कार्यालयातून वीज चोरीसाठी वापरात आणलेला दीडशे फुट सर्विस वायर जप्त करण्यात आला. सदर कारवाई महावितरणचे सहाय्यक अभियंता एन. बी. नन्नावरे यांच्या नेतृत्वात पार पडली.