वैद्यकीय अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करा ; कुरखेडा शहरवासीयांचे जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन

GADCHIROLI TODAY

कुरखेडा : येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील 25 वर्षापासून कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी ठाकर यांच्या मनमानी, मुजोरी, बेजबाबदार तसेच सूडभावनापूर्ण वागणुकीने त्रस्त येथील सर्वपक्षीय शहरवासीयांन उपजिल्हा रुग्णालयात धडक देत वैद्यकीय डॉ. ठाकर यांची चौकशी करून तत्काळ स्थानांतरण करावे, अशा मागणीचे निवेदन अधीक्षक डॉ. अमीत ठमके यांच्यामार्फत जिल्हा शल्यचिकित्सकांना सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, डॉ. संभाजी ठाकर बधिरीकरण तज्ञ आहेत. येथील रुग्णालयात सुसज्ज शस्त्रक्रिया गृह आहे. शस्त्रक्रिया प्रक्रियेत बधिरीकरण तज्ञांची महत्वाची भूमिका असते. तपासणी करीत फिटनेस प्रमाणित केल्याशिवाय शस्त्रक्रियेची पुढील प्रक्रिया होऊ शकत नाही. याच बाबीचा डॉ. ठाकर नेहमी गैरफायदा घेत आहेत. ते अनेक रुग्णांची अडवणूक करतात. खोटी भीती दाखवत रुग्णाला खाजगी रुग्णालयात जाण्यास बाध्य करतात. विशेष म्हणजे, डॉ. ठाकर यांना शस्त्रक्रियेकरीता विनंती करूनही नकार दिलेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया त्याच दिवशी याच रुग्णालयात ब्रम्हपूरी येथील खाजगी रुग्णालयातील बधिरीकरण तज्ञांना बोलावून यशस्वीपणे पार पडली. तसेच अनेक रुग्णांची येथे शस्त्रक्रिया करणे शक्य असताना त्यांनी फिटनेस प्रमाणित करण्यास नकार दिल्याने रुग्णाला इतरत्र हलवावे लागले. तिथे शस्त्रक्रिया कोणत्याही जोखीमेशिवाय यशस्वीपणे पार पडल्या. मात्र रुग्णांना अधिकचा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. सलग 25 वर्षापासून एकाच ठिकाणी ते सेवा बजावत असल्याने येथे त्यांचे हितसंबध निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णालयाची प्रतिमा मलीन होत आहे. तातडीने त्यांची चौकशी करीत त्यांची येथून हकालपट्टी करावी, अन्यथा सर्वपक्षीय शहरवासीयाकडून उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा काढत वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनाला कुलूप ठोकण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जिवन नाट, भाजपा तालुकाध्यक्ष नाजूक पूराम, जिल्हा नियोजन समिती सदस्य बबलू हूसैनी, माजी जिप सदस्य प्रभाकर तुलावी, भाजपा जिल्हा सचिव विलास गावंडे, माजी पंस सभापती गिरीधर तितराम, उपसभापती मनोज दूनेदार, भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक अॅड. उमेश वालदे, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, तालुका महिला कॉंग्रेस अध्यक्ष आशा तूलावी, उल्हास देशमुख, शोएब मस्तान, नपंचे आरोग्य सभापति अतूल झोळे, उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य सिराज पठान, विवेक निरंकारी, नगरसेवक सागर निरंकारी व शहरवासीय उपस्थित होते.