रानटी हत्तींची दहशत ; तेंदूपत्ता मजुरांनी धरली घराची वाट

GADCHIROLI TODAY

कुरखेडा :  रानटी हत्तींच्या कळपाने गोंदिया जिल्ह्यात एक महिना मुक्काम ठोकल्यानंतर पुन्हा कुरखेडा तालुक्यात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी वडेगाव-आंजनटोला जंगल परिसरात हत्तींचे दर्शन झाले होते. अशातच सिंदेसुर, पिटेसुर जंगल परिसरात हत्तींच्या आवाजाने तेंदूपत्ता मजुरांनी गावाच्या दिशेने पळ काढल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. भीतीपोटी मजुरांनी दुसऱ्याही दिवशी जंगलपरिसरात जाणे टाळल्याची माहिती आहे.
मागील महिन्यात रानटी हत्तींनी कुरखेडा तालुक्यात प्रवेश करीत शेतातील झोपडी, उन्हाळी धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. ऐन कापणीवर आलेल्या धान पिकाचे हत्तींच्या कळपाकडून नुकसान झाल्याने शेतक-यांवर आर्थिक संकट कोसळले. वनविभागाने सदर कळपावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते. या भागात एक- दोन दिवस राहिल्यानंतर हत्तींच्या कळपाने गोंदिया जिल्ह्यात प्रवेश केला. त्यामुळे वनविभागासह शेतक-यांनीही सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु, काही दिवसांपूर्वीच कुरखेडा तालुक्यात हत्तींच्या कळपाचे दर्शन झाले होते.
सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरु असून अनेक नागरिक तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलपरिसरात जातात. दरम्यान, परिसरातील नागरिक तेंदूपत्तासाठी सिंदेसुर, पिटेसुर जंगल परिसरात गेले असता, त्यांना हत्तींच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा भीतीपोटी मजुरांनी गावाच्या दिशेने पळ काढला. हत्तीच्या धुमाकुळाने दुसऱ्याही दिवशी तेंदूपत्ता मजुरांनी जंगलपरिसरात जाण्याकडे पाट फिरवल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह तेंदूपत्ता मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.