मेडीगट्टा प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनीचा मोबदला कधी देणार ? ; बाधित शेतकऱ्यांचे 33 व्या दिवशीही साखळी उपोषण सुरूच

मेडीगट्टा प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनीचा मोबदला कधी देणार ? ; बाधित शेतकऱ्यांचे 33 व्या दिवशीही साखळी उपोषण सुरूच
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्ह्यातील दक्षिण टोकावर वसलेल्या सिरोंचा तालुका सीमेवरील गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने बांधलेल्या मेडिगड्डा प्रकल्पामुळे अन्यायग्रस्त शेतकरी अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेतच आहेत. या बाधित शेतकऱ्यांकडून 33 व्या दिवशीही साखळी उपोषण सुरू आहे.
मेडीगट्टा प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनीचा मोबदला कधी देणार, प्रकल्पाचे पाणी हैदराबादपर्यंत तेलंगणा राज्यात नेत आहेत तर प्रकल्पाचा दुसऱ्या बाजूला असलेल्या सिरोंचा तालुक्यातील गावांना महाराष्ट्र सरकार का बरं पाणी उपलब्ध करून देवू शकत नाही, मेडिगड्डा करारानुसार २० टक्के पाणी आपल्या हक्काचा आहे. झिंगानूर सारख्या अनेक गावांत सध्या पाण्याची टंचाई असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत, 128 हेक्टरचे भुसंपादन तीन वर्षापासून स्थगित आहे. त्याचाच मोबदला महाराष्ट्र सरकार मिळवून देण्यास एवढा कालावधी लावत आहे तर 128 हेक्टर पेक्षा अधिकतम शेतजमीन बॅक वॉटरने बुडत असल्याबाबत आक्षेप शेतकऱ्यांनी नोंदविला आहे. त्या शेतजमिनींचा भुसंपादन कधी होणार ? अशा विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांचे सिरोंचा तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणामध्ये राम रंगुवार, लक्ष्मण गणपुरपु, वेंकटेश तोकला, प्रभाकर रेड्डी, मुस्कुला यांच्यासह बाधित शेतकरी सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे रोज वेगवेगळे शेतकरी उपोषण करीत आहेत.