गावाच्या निर्णयाला डावलून अवजड वाहतूक सुरूच ; वांगेपल्ली ग्रापंचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा

गावाच्या निर्णयाला डावलून अवजड वाहतूक सुरूच ; वांगेपल्ली ग्रापंचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील वांगेपली गावातून दररोज अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली असून धुळीमुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ग्रामस्थांनी सदर मार्गावर जड वाहतुकीस बंदी असल्याचे फलक लावले होते. मात्र, गावाच्या निर्णयाला डावलून आलापल्ली ते अहेरी, तेलंगाणा ते वांगेपली मार्गे अवजड वाहतूक सुरूच असल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. अवजड वाहनांची वाहतूक न थांबविल्यास आविसंचे नेते व माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार व उपसभापती रविंद्रबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा ग्रापंच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर रस्ता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाअंतर्गत येतो. या रस्त्यांवरुण जड वाहनांच्या वाहतुकीस प्रवेश बंदी असते, मात्र अवजड वाहनांची वर्दळ सुरूच असल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. या मार्गे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामूळे सदर रस्त्यावरून वाहनांना प्रवेश बंदी करण्यासाठी ग्रामस्थांनी अवजड वाहनांच्या प्रवेशास रोख लावण्यासाठी वाहतुकीस बंदी असल्याचे फलक लावले होते. तरी अवजड वाहनांची रेलचेल सुरूच आहे. यासाठी वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी, उपसरपंच राजेश कोतपल्लीवार, सदस्य संजय आत्राम, कल्पना मडावी, प्रियंका तोडसाम, निलेश आलाम, दुर्गे, संतोष येरमे, महेश नैताम, बाबुराव नागपुरे, ईश्वर सिडाम व ग्रामस्थांनी जिपचे मुख्यकार्यपालन अधिकारी यांना निवेदन देऊन सदर मार्गावरील जड वाहतुक बंद करण्याचे निर्देश देण्यात यावे, अन्यथा आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रविंद्रबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.