ट्रॅक्टर-दुचाकीची भीषण धडक; एक ठार तर एक गंभीर

ट्रॅक्टर-दुचाकीची भीषण धडक; एक ठार; एक गंभीर
– मुरुमगाव वनविभाग कार्यालयाजवळील घटना

GADCHIROLI TODAY
धानोरा : भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवरील एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना 29 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास मुरुमगाव येथील वनविभाग कार्यालयासमोर घडली. इंद्रकुमार रामसाय धुर्वे (22) रा. पन्नेमारा असे मृतकाचे तर पतिराम गंगूराम धुर्वे (50) असे गंभीर जखमीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार पन्नेमारा येथून वरात घेऊन मुरुमगाव मार्गे रामपूर येथे वरात घेऊन ट्रॅक्टर जात होते. तर दुचाकीवरुन इंद्रकुमार धुर्वे, पतिराम धुर्वे व दुचाकीचालक सुरेश रामु मडावी (32) रा. पन्नेमारा हे तिघेही याच लग्नाला जात होते. दरम्यान मुरुमावजवळ पोहचताच वनविभागाच्या कार्यालयासमोर रामपूकरकडे जात असतांना ट्रॅक्टर व पिकअप वाहनाला ओव्हरटेक करीत असतांना दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट ट्रॅक्टरखाली घुसल्या गेले. सदर अपघात एवढा भीषण होता की, इंद्रकुमार याचेवरुन ट्रॅक्टरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर पतिराम धुर्वे गंभीर जखमी झाला. यात सुरेश मडावी यास कोणतीही जखम झाली नाही. तत्काळ जखमींना प्रथम मुरुमगाव व येथून धानोरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र पतिराम यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास धानोरा पोलिस करीत आहेत.