चंद्रपूर जिल्ह्यातून देशी-विदेशी दारूची तस्करी ; तीन दुचाकींसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

– गडचिरोली पोलिसांची कारवाई
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातून देशी-विदेशी दारूची दुचाकी वाहनांच्या साहाय्याने तस्करी करणाऱ्यांकडून गडचिरोली शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने तीन दुचाकींसह 2 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर केली. याप्रकरणी 3 दारू विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. मंगरु नानू नरोटे (51) रा. कुथेगाव, अजय देवराव हिचामी (24) रा. फुलबोडी दोन्ही ता. धानोरा, रावजी मलुराम नैताम (45) रा. कनेरी ता. गडचिरोली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातून दुचाकी वाहनांच्या सहाय्याने देशी-विदेशी दारूची गडचिरोलीत तस्करी होत असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे डीबी पथकाने चंद्रपूर मार्गावरील नवेगाव जवळ सापळा रचला. दरम्यान, तीन संयशीत दुचाकीस्वार येताना दिसताच त्यांना थांबवून तपासणी केली असता, त्यांच्याकडे 55 हजार रूपये किंमतीची देशी-विदेशी दारु आढळून आली. पथकाने दारु व 1 लाख 67 हजार रूपये किंमतीच्या 3 दुचाकी असा एकूण 2 लाख 22 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिनही आरोपींना अटक केली. सदर कारवाई ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे धनंजय चौधरी, स्वप्नील कुडावले, पुरूषोत्तम हलामी, अतुल भैसारे, वृशाली चव्हाण यांनी पार पाडली.