गडचिरोलीत आंबा महोत्सव -2023 ; जाणून घ्या प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आलेले आंब्यांचे सुधारित वाण

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्र सोनापूर-गडचिरोली येथे आज आंबा महोत्सव -2023 चे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक वाण कलेक्टर, सीईओ तसेच महाराष्ट्रातील सुधारित आंब्याचे वाण लंगडा, दशेरी, तोतापुरी, रत्ना, हापूस, लालबाग, पायरी, मंजिरी, आम्रपाली, सफेदा, सिंधू, सिरकुरस, मुलगोवा, सुवर्णरेखा, मल्लीका, केशर आदी प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आले होते.

महोत्सवात आलेल्या स्थानिक वाणांचा प्रसार आणि प्रचार तसेच संवर्धन होण्याच्या दृष्टीने वाटचाल करणे अतिशय गरजेचे आहे. गडचिरोली जिल्हा हा विदर्भातील नंदनवन म्हणावयास हरकत नाही. हीच जैवविविधता येथील शेतकरी बांधवांना त्यांची आर्थिक स्थिती उंचावण्याकरीता मदतीचा एक स्त्रोत आहे. गडचिरोलीतील कलेक्टर आंब्याची ओळख राज्यभर पोहोचवा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी केले. या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंदेकृवि अकोला येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ. डी. एम. पंचभाई, डॉ. एस. आर. पाटील प्राध्यापक फळशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस. जी. भराड, कृषी अर्थशासत्र व सांख्यिकी डॉ. आर. डी. वाळके, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. संदीप क-हाळे, सहयोगी प्रा. डॉ. वाय. आर. खोब्रागडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, आत्माचे प्रकल्प संचालक पंढरीनाथ डाखळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ समन्वयक सचिन देवतळे, प्रकल्प अधिकारी ज्योतीताई कडू, उमेदचे समन्वयक प्रफुल भोपये, रेशीम उद्योगचे वासनिक, प्रगतशिल शेतकरी प्रतीभा चौधरी, विषय विशेषज्ञ निलीमा पाटील, एस. के. लाकडे, डॉ. व्ही. एस. कदम, डी. व्ही. ताथोडे, पी. ए. बोथीकर, एन. पी. बुद्धेवार, डॉ. पी. एन. चिरडे तसेच आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

जिल्ह्यातील वातावरण आंबा या फळपिकास अनुकूल असल्यामुळे शेतक-यांनी आंबा पिकाकडे आर्थिक उत्पननाचे साधन म्हणून बघावे, असे आवाहन सचिन देवतळे यांनी केले. डॉ. खोब्रागडे यांनी आंबा पीक लागवड, तंत्रज्ञान, आंबा पिकाची लागवड करताना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. निलीमा पाटील यांनी आंब्याचे मूल्यवर्धन व प्रक्रिया या विषयांवर मार्गदर्शन करीत आंब्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ आंब्याचे लोणचे, ज्यूस, पन्हा, आंबा वळी बनविण्याची विधी सांगितली.
गडचिरोलीत महाराष्ट्रातील इतर वाणांचा चांगला दर्जा
आंबा हा फळपिकांचा राजा आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आंब्याची लागवड केली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने हापूस, बेंगनपल्ली, दशेरी, लंगडा, तोतापुरी, केसर आदी वाणांचा समावेश आहे. गडचिरोली येथे बेंगनपल्ली, रत्ना, दशेरी, केसर या वाणांचा चांगला दर्जा आढळून आला आहे. तसेच स्थानिक कलेक्टर, सीईओ या वाणांची लागवड व संशोधन सुरु आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतक-यांनी शासकीय योजनांमधून आंबा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचे आवाहन डॉ. संदीप क-हाळे यांनी केले.