‘या’ तालुक्यात 17 जनावरे लम्पीने बाधित ; जनावरांवर पशुवैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवून

GADCHIROLI TODAY
देसाईगंज : तालुक्यातील मोहटोला परिसरात जनावरांवर लम्पी स्किन डिसीजची काही जनावरांना लागण झाली होती. परशु वैद्यकीय विभागाने वेळीच खबरदारी घेतल्याने या भागात लम्पी स्किन डिसीज रोगाचा प्रसार झाला नाही. सध्या या भागात 17 जनावरांवर हा रोग दिसून येत आहे. परंतु तो आटोक्यात असून जनावरांवर योग्यप्रकारे औषधोपचार सुरु आहे.
देसाईगंज तालुक्यातील मोहटोला येथे 5 जनावरे, तसेच तुळशी, आमगाव, देसाईगंज शहर परिसर आदी भागात एकूण 17 जनावरे लम्पीग्रस्त आढळून आली होती. याबाबत वृत्त प्रकाशित होताच जनावरांवर वेळीच उपचार करण्यात आल्याने जनावरे बरी होण्याच्या स्थितीत आहेत, अशी माहिती पशुधन विस्तार अधिकारी डॉ. प्रदीप बावणे यांनी दिली. विशेष म्हणजे, सध्या उपचार सुरु असलेल्या जनावरांवर तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवून आहेत. जनावरांवर वेळोवेळी उपचार केला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर परिसरातील जनावरांना लम्पी स्किन डीसीज आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. लाखांदूरला लागूनच देसाईगंज तालुका असल्याने या तालुक्यातील अनेक जनावरांना या आजाराची लागण झाल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात लम्पी स्किन डिसीजने गायी-बैलांना आपल्या विळख्यात घेतले होते. यावर्षी केवळ देसाईगंज तालुक्यात या रोगाचा संसर्ग आढळून आला आहे.