शेतकऱ्यांनी ‘या’ क्रमांकावर तक्रार नोंदविल्यास बोगस कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर होणार कारवाई

शेतकऱ्यांनी ‘या’ क्रमांकावर तक्रार नोंदविल्यास बोगस कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर होणार कारवाई
– कृषी विभागाकडून तक्रार निवारण कक्षाची स्थापना
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : शेतकऱ्यांनी बियाणे, खते, किटकनाशके, अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावे. बियाणे, खते छापील किंमतीपेक्षा ज्यादा दराने विक्री होत असल्यास तालुकास्तरावर कृषी विभागाशी संपर्क करावे. शेतकऱ्यांनी तक्रार करण्याकरीता 9404535481 या क्रमांकावर तसेच 07132-222593, 222312, टोल फ्री क्र. 1800233400 या क्रमांकावर सुद्धा संपर्क करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यात बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षात शेतकऱ्यांच्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबत असलेल्या प्रत्येक तक्रारींचे निवारण होईल. बोगस बियाणे, खते, किटकनाशके, लिंकिंग, ज्यादा दराने विक्री, पक्की बिलाची पावती न देणे आदींबाबत शेतक-यांना तक्रार करता येणार आहे. नियंत्रण कक्ष 15 मे ते 25 ऑगस्ट या दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु राहील. या दरम्यान शेतकऱ्यांना तक्रारी करता येतील. तसेच बोगस खते, बियाणे विक्री होत असल्यास नजीकच्या तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.
फेरीवाले, विक्रते (घरपोच सेवा देणारे) यांच्याकडून बी बियाणे, खते व किटकनाशक यांची खरेदी करू नये. कोणत्याही परिस्थतीत छापील किंमतीपेक्षा अधिक दराने बियाणे, खते खरेदी करू नये. विक्रेते जबरदस्ती करत असल्यास त्वरित 8698389773 या व्हॉट्अॅप क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांनी केले आहे.
निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी
परवाना धारक विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे, पक्के बिल घ्यावे, बिलावर दुकानाचे नाव, लॉट नंबर, खरेदीदाराचे नाव, विक्रीची किंमत, अंतिम मुदत असल्याची खात्री करूनच घ्यावी. पावतीवर शेतकऱ्याची सही व अंगठा तसेच विक्रेत्यांची सही व शिक्का असावा. कच्चे बिल स्वीकारू नये. पक्क्या बिलाचा आग्रह करावा. हंगाम संपेपर्यंत बिल जपुन ठेवावे. पेरणीसाठी पिशवी फोडताना खालील बाजूने फोडावी व पिशवीला असलेले टॅग, लेबल जपून ठेवावे.