नक्षल्यांद्वारे तेंदूफळींची जाळपोळ ; तेंदूपानांचे दर वाढविण्याचा इशारा

– धानोरा तालुक्यातील तीन गावातील कृत्य

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत धानोरा तालुक्यातील तीन गावात 31 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नक्षल्यांनी तेंदूफळीची जाळपोळ करीत हैदोस घातल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नक्षल्यांचे धमकीवजा पत्रक आढळून आले असून यात नक्षल्यांनी तेंदूपानाचे दर वाढवून देण्याची मागणी केली आहे. मागील बराचसा काळ शांत बसलेल्या नक्षल्यांनी जाळपोळ घडवून आणल्याने या परिसरातील कंत्राटदारासह मजूर वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. या माध्यमातून आदिवासींचे वर्षभराचे अर्थचक्र चालते. यातून नक्षल्यांनादेखील मोठ्या प्रमाणात खंडणी मिळत असते. मात्र, मागील वर्षी कमी भाव मिळाल्याने यंदा अनेक ठिकाणी तेंदू पानाची मजुरी घसरली आहे, तर काही ठिकाणी कंत्राटदारांनी ग्रामसभांनाच तेंदूपाने गोळा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नक्षल्यांना रसद मिळणे बंद झाल्याने नक्षलींची आर्थिक कोंडी झाली आहे. परिणामी खवळलेल्या नक्षल्यांनी छत्तीसगड सीमेवरील धानोरा तालुक्यातील मुरुमगाव पोलिस मदत केंद्र हद्दीतील रिधवाहीसह तीन गावातील तेंदूफळींची जाळपोळ केली. सदर ठिकाणी नक्षल्यांनी एक धमकीवजा पत्रक टाकले असून यात तेंदू पानांना अकराशे रुपये प्रती गोणी भाव देईपर्यंत आंदोलन पुकारा, कंत्राटदारांना पिटाळून लावा, अशी धमकी दिली आहे. पत्रकाच्या शेवटी उत्तर गडचिरोली डिव्हीजन कमिटी भाकपा (माओवादी) असा उल्लेख आहे. मागील बराचसा काळ उत्तर गडचिरोलीत नक्षली चळवळ थंड पडली होती. मात्र तेंदूफळी जाळीपोळीच्या या घटनेने या भागात नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
छत्तीसगड सीमेलगत असलेल्या धानोरा तालुक्यातीन तीन ठिकाणी तेंदूपानांची जाळपोळ करण्यात आली आहे. घटनास्थळी धमकीवजा नक्षल्यांचे पत्रकही आढळून आले आहे. सदर कृत्य नक्षल्यांचे की समर्थकांचे याचा तपास सुरु आहे. या घटनेसंदर्भात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास सुरु आहे. – निलोत्पल, पोलिस अधीक्षक