शेतजमिनीच्या वादावरून हत्या ; आरोपीस 7 वर्ष सक्त मजुरी

– जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : शेतजमिनीच्या वादावरून हत्या करणाऱ्या आरोपीस 7 वर्ष सक्त मजुरी व 25 हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांनी सुनावली. आसाराम बिजाराम कुमरे (35) रा. कोटलडोह ता. कुरखेडा असे आरोपीचे नाव आहे.
कोरची तालुक्यातील मोहगाव येथील मृतक तुळजाबाई मंगू कल्लो (60) ही घटनेच्या आठ दिवसांपूर्वी फिर्यादी अनुसया वासुदेव कुमरे रा. कोटलडोह ता. कुरखेडा हिच्याकडे भेटण्याकरीता येवून तिच्याकडेच राहत होती. घटनेच्या दिवशी 18 जुलै 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता ती भाचा सुनील बिरसिंग कुमरे याच्या घरी जावून येते, असे फिर्यादीस सांगून गेली. त्यानंतर 10 वाजताच्या सुमारास सुमित्रा सुनील कुमरे हिने फिर्यादीला सांगितले की, तुमची आई तुळजाबाई कल्लो हिला आरोपी आसाराम बिजाराम कुमरे (35) रा. कोटलडोह ता. कुरखेडा याने शेतजमिनीच्या वादावरुन लाकडी पाटीने मारहाण केल्याने ती बेशुद्ध पडल्याचे सांगितले. लागलीच फिर्यादीने जावून पाहिले असता, ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती.
दरम्यान त्याच दिवशी ती सायंकाळी 5 वाजता मरण पावली. याबाबतची तक्रार फिर्यादीने पुराडा पोस्टे येथे दाखल केली. तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांनी आरोपी आसाराम बिजाराम कुमरे यास कलम 304 भाग-2 अन्वये 7 वर्षाची सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकिल एस. यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले. तसेच गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोउपनि दीपक अमोल शेळके व कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांनी केले.