थकीत हप्त्यांमुळे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

-आमदार सुधाकर अडबाले यांनी वेधले लक्ष

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : सातव्‍या वेतन आयोगाच्या थकबाकीचा चौथा हप्‍ता अदा करण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय जाहिर झाला आहे. मात्र, शिक्षकांना अद्यापही दुसरा, तिसरा हप्‍ताच मिळाला नसल्‍याने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांत तीव्र असंतोष पसरला आहे. त्‍यामुळे शासनाने सातव्‍या वेतन आयोगाचे सर्व थकीत हप्‍ते अदा करावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे.
स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्‍च माध्यमिक व आश्रम शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्‍या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्‍ताच मिळाला नाही. काहींना तर पहिला हप्‍ता सुद्धा मिळाला नाही. त्‍यातच २४ मे २०२३ रोजी वित्त विभागाचा चौथा हप्‍ता अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला. त्यानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना जून महिन्यात वेतनासोबत सातव्या वेतन आयोगाच्या चौथा हप्ताची रक्‍कम मिळेल. मात्र, राज्यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्‍च माध्यमिक व आश्रम शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अद्याप दुसरा व तिसरा हप्ता मिळालेला नाही. ही बाब शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी असल्‍याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.
इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना सातव्‍या वेतन आयोगाचे थकीत असलेले सर्व हप्‍ते तात्‍काळ देण्यात यावे, अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे. यासंदर्भात शासनस्‍तरावर पत्रव्‍यवहार केला असून ही मागणी रेटून धरणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. जून महिन्‍यात थकीत हप्‍ते न मिळाल्‍यास जुलै महिन्‍यात काही शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.