smuggling ; 12 KG गांजासह कर्नाटकातील दोन तस्कर अडकले जाळ्यात

मुलचेरा पोलिसांची कारवाई

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : कर्नाटक राज्यातील दोन तस्करांकडून १२ किलो गांजा जप्त करीत त्यांना अटक केल्याची कारवाई मुलचेरा पोलिसांनी ३ जून रोजी केली. आनंद सपन मंडल (48) व अलोक आनंद मंडल (22) दोघेही रा. कर्नाटक अशी आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मुलचेरा तालुक्यातील बंदूकपल्ली येथून पराराज्यात गाजांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मुलचेरा पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे मुलचेरा पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान आरोपी बंदूकपल्ली गावातून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हलची प्रतिक्षा करीत असतांना पोलिसांनी आनंद मंडल या आरोपीस 7 किलो गांजासह अटक केली. तर फरार झालेला दुसरा आरोपी अलोक मंडल यास चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिसांनी अटक करीत त्याचेकडून 5 किलोचा गांजा जप्त केला.
गांजा तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी बापलेक असल्याची माहिती आहे. मुलचेरा पोलिसांनी आरोपी बाप आनंद मंडल यास बंदूकपल्ली गावातून अटक करून चौकशी केली असता एक आरोपी एम. एच. 33 टी 3841 या ट्रॅव्हल्सने चंद्रपूरकडे जात असल्याची माहिती दिली. लगेच मुलचेराचे ठाणेदार अशोक भापकर यांनी गोंडपिपरी पोलिसांना माहिती देत नाकाबंदी करण्यास सांगितले. गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरु यांनी जुन्या तहसिल कार्यालयासमोर नाकांबदी करीत अलोक मंडल यास ताब्यात घेतले. दोन जिल्ह्यातील पोलिस दलाने रचलेल्या जाळ्यात गांजा तस्कर बापलेक अडकल्या गेले.