स्वच्छता अभियानासाठी सरसावले वनाधिकारी ; गडचिरोली वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक

स्वच्छता अभियानासाठी सरसावले वनाधिकारी ; गडचिरोली वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवसाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र कार्यालय गडचिरोली (प्रादेशिक) व सामाजिक वनीकरण विभाग जिल्हा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थान परिसरात आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेमाना देवस्थान परिसरातील कचरा, प्लास्टिक, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आदी गोळा करून स्वच्छता केली. वनविभागाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
गडचिरोली वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली वन परिक्षेत्राचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज ठोंबरे यांनी हा उपक्रम राबविला. सेमाना देवस्थान हे गडचिरोली शहरवासीयांचे आराध्य दैवत आहे. येथे दर शनिवारी भाविकांची मोठी गर्दी असते. तसेच शनिवारला अनेक भाविक येथे सामूहिक भोजनाचेही आयोजन करतात. मात्र अनेकजण जेवण केल्यानंतर प्लास्टीक पत्रावळी, ग्लास, वाट्या तसेच उरलेले अन्न तिथेच फेकून देतात. त्यामुळे या परिसरात सर्वत्र कच-याचे साम्राज्य निर्माण होत असते. त्या पार्श्वभूमीवर तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वनविभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी गडचिरोली प्रादेशिक कार्यालयातील नवघरे, जनबंधू, वासेकर, नंदेश्वर यांच्यासह वनपाल व सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी नीळकंठ वासेकर, खुलसंगे, अलोने आदी उपस्थित होते. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेमाना देवस्थान परिसरात स्वच्छता मोहीम राबवून लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला.
अभियानादरम्यान वनाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले की, तापमानात होणारी वाढ आणि वातावरणातील बदलांना मानवच जबाबदार आहे. आपल्या वागणुकीत बदल करून नैसर्गिक साधन संपत्तीचा शाश्वत वापर न केल्यास दिवसेंदिवस तापमानात वाढ, अवकाळी पाऊस, दुष्काळ, वादळे अशा संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यायी वस्तू वापराव्यात. तसेच पर्यावरणपूरक वाहने किंवा सार्वजनिक वाहनांचा अधिक वापर करावा. त्यामुळे प्रदूषण कमी करून तापमान वाढीला आळा बसू शकतो. घर, अंगण, परिसर, कार्यालय, मंदिर, बगिचा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. नगर परिषदेने ओला व सुका कचरा वेगळा करून कचरा व्यवस्थापनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिदत्त शर्मा यांनी केले आहे.