चिल्लर विक्रेत्यांना सुगंधीत तंबाखू पुरवठा करणारा अडकला जाळ्यात ; गडचिरोली पोलिसांची कारवाई

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : पोलिस ठाण्यातील डीबी पथकाने सापळा रचून वाहनासह 3 लाख 77 हजाराचा सुगंधित तंबाखू जप्त केल्याची कारवाई आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास केली. याप्रकरणी यशवंत विठ्ठल हर्षे (41) रा. गिलगाव यास अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गिलगाव येथून कारद्वारे गडचिरोली शहरातील चिल्लर विक्रेत्यांना सुगंधीत तंबाखू पुरवठा होणार असल्याची माहिती गडचिरोली पोलिस ठाण्यातील डीबी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे डीबी पथकाने शहरातील आरमोरी मार्गावरील खरपुंडी नाक्यावर सापळा रचला. दरम्यान, एमएच 33 व्ही 5562 क्रमांकाची संशयीत कार येताना दिसताच पथकाने सदर कारला थांबवून तपासणी केली असता, वाहनात 27 हजार रुपये किंमतीचा सुगंधीत तंबाखू आढळून आला. पोलिसांनी 3 लाख 50 हजार रुपयांची कार व सुगंधीत तंबाखू असा एकूण 3 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी यशवंत हर्षे याला अटक केली. पोलिसांच्या या कारवाईने सुगंधीत तंबाखू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
सदर कारवाई पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक पुनम गोरे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे धनंजय चौधरी, स्वप्नील कुडावले, परशुराम हलामी, तुषार खोब्रागडे, वृक्षाली चव्हाण आदींनी पार पाडली.