चलनातून बाद दोन हजाराची नोट तेंदू मजुरांच्या माथी ! ; मजुरांमध्ये गोंधळ

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला तेंदूपत्ता हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा हंगाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेंदूपत्ता हंगामात कंत्राटदाराकडून मजुरी देताना दोन हजाराची नोट मजुरांच्या माथी मारली जात असल्याने मजुरांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारने नुकतीच दोन हजाराची नोट चलनातून बंद केली आहे. ज्यांच्याकडे दोन हजाराची नोट असेल त्यांना ती सप्टेंबर महिन्यापर्यंत बॅंकेत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील तेंदू कंत्राटदाराकडून दोन हजाराची नोट मजुरांच्या माथी मारली जात आहे. हा प्रकार जिल्ह्यातील विविध तालुक्यात दिसून येत आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागातील मजुरांना दोन हजाराची नोट बॅंकेत जमा करण्यासाठी तालुका मुख्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. तर दुसरीकडे कंत्राटदाराकडून मजुरांना दोन हजाराची नोट देवून आपला काळा धन पांढरा करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. मागील दोन-तीन वर्ष दोन हजाराची नोट या भागात दुर्मिळ झाली होती. मात्र ही नोट बंद होताच ती सर्वत्र दिसायला लागली आहे. त्यामुळे हा विषय जिल्हाभरात चर्चेचा बनला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मजूर वर्गाचे तेंदूपत्ता संकलनावरच वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. जिल्ह्यातील कोरची, धानोरा, एटापल्ली, कुरखेडा, अहेरी, एटापल्लीसह अन्य तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असतानाही ठेकेदार तेंदूपत्ता मजुरांना मजुरी म्हणून दोन हजार रुपयांची नोट हातात देत आहेत. सप्टेंबर महिन्यापर्यंत 2 हजाराच्या नोटा बँकेत जमा करावयाच्या आहेत. त्यासाठी पॅन कार्डची आवश्यकता आहे. मात्र जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणा-या मजुरांजवळ पॅनकार्ड नाही. पॅनकार्डशिवाय दोन हजाराची नोट बॅंकेत कशी जमा करणार? असा प्रश्न मजूर वर्गाला पडला आहे.
नक्षल हालचालींवर पोलिसांची करडी नजर
खंडणीमधून जमा झालेला पैसा नक्षली चळवळ वाढवण्यासाठी वापरतात. मात्र सरकारने अचानक 2 हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नक्षल्यांसमोर दोन हजार रुपयांच्या नोटा बॅंकेत जमा करणे एक आव्हान बनले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलिस विभाग अलर्ट
दोन हजार रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय घेत सरकारने सप्टेंबर महिन्यापर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून बँकांमध्ये पैसे जमा करण्याचा प्रयत्न होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलिस विभाग सर्व बँकांवर तसेच नक्षल्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून आहे. कोणत्याही प्रकरणाचा नक्षलवादाशी संबंध असल्याचे आढळून आल्यास निश्चितच कारवाई केली जाईल.
नीलोत्पल, जिल्हा पोलिस अधीक्षक, गडचिरोली