नक्षलविरोधी कारवायांसाठी तैनात ‘वेन्स’चा निधन

नक्षलविरोधी कारवायांसाठी तैनात ‘वेन्स’चा निधन
– नक्षलग्रस्त कोठी येथे होता तैनात

GADCHIROLI TODAY
अहेरी : येथील सीआरपीएफ 37 बटालियनचा श्वान वेन्स याचे 4 जून रोजी सायंकाळी भामरागड तालुक्यातील कोठी येथे आकस्मिक निधन झाले. वेन्स हा अतिसंवेदनशिल नक्षलग्रस्त कोठीमध्ये नक्षलविरोधी कारवायांसाठी तैनात करण्यात आले होते. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्याच्या अत्यंत संवेदनशिल नक्षलग्रस्त भागात नक्षलविरोधी अभियानात वेन्सने भाग घेऊन पोलिस दलाला आईईडी, अॅम्बूश आदी नुकसानीपासून अनेकदा वाचविले होते.
श्वान वेन्सचा जन्म 14 नोव्हेंबर 2019 रोजी डीबीटीएस (डॉग ब्रिडींग अॅण्ड ट्रेनिंग स्कूल) तरालू येथे झाला. तेथे त्याला दोन हॅण्डलर कॉन्स्टेबल जीडी अभिजीत चौधरी आणि कॉन्स्टेबल जीडी शुभजित गराई यांच्यासोबत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान वेन्सने सर्वोत्कृष्ट श्वानाचा किताब पटकावला होता. त्यानंतर 13 एप्रिल 2021 पासून त्याची गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे 37 बटालयिनमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. वेन्स स्फोटके शोधून, आईपी (इन्फन्ट्री पेट्रोल) आणि हल्ला करण्यात माहीर होता. वेन्सच्या जाण्याने पोलिस दलाला मोठा हादरा बसला आहे. अशा शूर श्वानाचा सन्मान करण्यासाठी 37 बटालियनचे कमांडंट एम. एच. खोब्रागडे, 9 बटालियनचे कमांडंट आर. एस. बालापूरकर, सर्व अधिकारी, अधिनस्थ अधिकारी आणि सर्व जवानांद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ओल्या डोळ्यांनी वेन्सला अखेरचा निरोप देण्यात आला.