वाघाच्या दहशतीत खडतर रस्त्यावरून ‘या’ गावांचा प्रवास सुरु ; देलोडा-किटाळी मार्गाकडे दुर्लक्ष

वाघाच्या दहशतीत खडतर रस्त्यावरून ‘या’ गावांचा प्रवास सुरु ; देलोडा-किटाळी मार्गाकडे दुर्लक्ष
GADCHIROLI TODAY

आरमोरी : तालुक्यातील देलोडा, सुर्यडोंगरी, आकापुर, किटाळी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असूनही संबंधित विभागाकडून कानाडोळा केला जात आहे. विशेष म्हणजे, सदर मार्गावरून वाघाची दहशत असूनही नादुरुस्त रस्त्यावरून वडधा परिसरातील अनेक गावातील लोकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
तालुका मुख्यालय असलेल्या आरमोरी शहराकडे जायचा असल्यास देलोडा-किटाळी हा मार्ग सोयीस्कर व अतिरिक्त 12 किमीचा प्रवास कमी होतो. यामुळे वडधा परिसरातील देलोडा खुर्द, देलोडा बूज, बोडधा, वडधा, देशपुर, देविपुर. कुरुंझा, खरपी यासह विविध गावातील नागरिक विविध कामासाठी आरमोरी शहराकडे जाण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करतात. सदर रस्त्याच्या दुरस्तीच्या कामाला संबंधित विभागाने सुरुवात करून रस्त्याचे काम अर्ध्यावरतीच बंद केले. सध्यस्थितीत रस्त्याची पूर्णतः चाळण झाली असून जागोजागी जीवघेणे खड्डे पडले आहेत. जागोजागी गिट्टी उखडली आहे. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशातच सदर मार्गावर वाघाची सुद्धा दहशत असल्याने नागरिकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने सदर रस्त्याची पाहणी करून रस्त्यावरील खड्डे बुजवून, खडीकरण, डांबरीकरण करून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची कटाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतुन केली जात आहे.