उभ्या ट्रकला दुचाकीची धडक ; दोन युवकांचा जागीच मृत्यू

उभ्या ट्रकला दुचाकीची धडक ; दोन युवकांचा जागीच मृत्यू

– देवडी गावाजवळ भीषण अपघात
GADCHIROLI TODAY
चामोर्शी : उभ्या ट्रकला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास चामोर्शी तालुका मुख्यालयापासून 3 किमी अंतरावर असलेल्या देवडी गावाजवळ घडली. प्रशांत सुनील सरकार (35), बादल कलीपद मल्लीक (35) दोघेही रा. श्रीनिवासपूर अशी मृतकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी जवळील देवडी गावाजवळ धान वाहतूक करणारे एमएच 30-एबी 4644 या क्रमांकाचा नादुरस्त अवस्थेत रस्त्यावरच उभे ठेवण्यात आले होते. दरम्यान 5 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास श्रीनिवासपूर येथील प्रशांत सुनील सरकार व बादल कलीपद मल्लिक हे दोन युवक एम. एच. 33-व्हाय-7972 क्रमांकाच्या एक्टिवा दुचाकीने चामोर्शी येथून गडचिरोलीच्या दिशेने जात होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास त्यांना रस्त्यावर उभे ट्रक दिसून न आल्याने ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसली. सदर अपघात एवढा भीषण होता की दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती प्राप्त होताच चामोर्शी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठित पंचनामा केला. मृतक दोन्ही युवकांना ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी हलविण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांचे मार्गदर्शनात पीएसआय तुषार पाटील करीत आहेत.