जिल्ह्यात वज्राघातासह पावसाची शक्यता

जिल्ह्यात वज्राघातासह पावसाची शक्यता

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्ह्यातील 1 किंवा 2 ठिकाणी वज्राघातासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील तीन दिवस जिल्ह्यातील काही भागात विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
प्रादेशिक हवामान केंद्रांच्या अहवालानुसार ९ ते ११ जून पर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळी वारा व पाऊस येण्याची शक्यता आहे. सोबतच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने सुद्धा जिल्ह्यातील 1 किंवा 2 ठिकाणी वज्राघातासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यात पुढील तीन दिवस येलो अलर्ट असल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
वज्राघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी आकाशात विजेचा कडकडाट, गडगडाट असतांना धातुजन्य वस्तू जवळ बाळगू नका. धातुजन्य खांब, वीज सुवाहक वस्तू जवळ राहू नका. विशेषतः उंच झाडापासून दूर रहावे. उंच ठिकाणी असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी यावे. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने केले आहे.