अवैध दारु विक्रेत्यांविरोधात आरमोरी पोलिसांची धडक मोहिम ; तीन दिवसात लाखोंच्या मुद्देमालासह पाच विक्रेत्यांना अटक

GADCHIROLI TODAY

आरमोरी : आरमोरी व तालुक्यातील ग्रामीण भागात अवैधारित्या देशी, विदेशी दारु विक्रीला उधाण आले होते. या अवैध दारु व्यावसायिकांवर लगाम कसण्यासाठी आरमोरी पेालिसांनी कंबर कसली आहे. दारु विक्रेत्यांविरोधात आरंभलेल्या धडक मोहिमेअंतर्गत मागील तीन दिवसात दारुसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करीत पाच दारुविक्रेत्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आरमोरी पोलिसांनी अवैध व्यावसायिकांविरोधात धडम मोहिम राबविली असून याअंतर्गत मागील तीन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी राबविण्यात आलेल्या मोहिमेत देशी, विदेशी, मोहाच्या दारुसह एकूण 2 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर याप्रकरणी पाच दारुविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील इंदिरानगर येथील राहूल कैलास टेंभूर्णे (38) यांचे घरी सोमवारी टाकलेल्या धाडीत 16 हजार 800 रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली. 6 जून रोजी तालुक्यातील वैरागड येथील बादल तुळशिदास गिरीपुंजे यांच्या दुचाकी वाहनाची तपासणी केली असता विदेशी दारु तसेच एम. एच. 33-6194 क्रमांकाचे दुचाकी वाहन असा एकूण 42 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच दिवशी वैरागड-वासाळा मार्गावर नाकांबदी केली असता एम. एच. 33-एई-3532 क्रमांकाच्या दुचाकीवरुन जात असलेल्या मारोती यादवराव पात्रीकर (30) व लोमेश्वर बाबुराव भोयर (33) दोघेही रा. वासाळा यांची तपासणी केली असता त्यांचेकडून मोहाची दारु तसेच मोबाईल व दुचाकी असा 70 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वैराड येथील संदीप श्रीरंग पात्रीकर यांच्या शेतात पाहणी केली असता हातभट्टी मोहदारुसह मोबाईल असा एकूण 14 हजारांचा माल जप्त करण्यात आला. बुधवारी दुचाकीने अवैधरित्या दारुची तस्करी केल्या प्रकरणी वैरागड येथील शुभ्रमणी कालिदास गजभिये (33) व त्याची पत्नी मनस्वी शुभ्रमणी गजभिये (22) यांचेकडून देशी, विदेशी दारु, मोबाईल व दुचाकी असा 1 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशाप्रकारे पाच वेगवेगळ्या कारवाईत एकूण 2 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त करीत पाच आरोपींवर दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या नेतृत्वात आरमोरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंडलिक यांचेसह पथकाने पार पाडली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुनघाटे करीत आहेत. आरमोरी पोलिसांच्या या धडक सत्रामुळे तालुक्यातील दारु विक्रेत्यांसह अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.