आंदोलनाच्या धसक्याने वांगेपल्ली गावातून जडवाहनांची वाहतूक झाली बंद ; व्यापाऱ्यांसह नागरिकांना दिलासा

GADCHIROLI TODAY

अहेरी : माजी जिप अध्यक्ष व बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार व गावकऱ्यांनी वांगेपल्ली गावातून जड वाहनांची वाहतूक बंद करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देताच, संबंधितांनी दखल घेत, या गावातून जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थ व व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अहेरी तालुक्यातील वांगेपली गावातून दररोज जडवाहने आल्लापल्ली ते अहेरी मार्गे तेलंगणा येथे जात होती. तसेच तेलंगणावरून येणारी वाहने वांगेपल्ली मार्गाने जात होती. या जडवाहनांच्या वाहतुकीमुळे गावातील रस्ते खराब होऊन नागरिकांना व व्यापाऱ्यांना धुळीचा सामना करावा लागत होता. तसेच जडवाहनांमुळे जीवितहानी होण्याची शक्यताही बळावली होती. त्यामुळे जडवाहनांची वाहतूक तत्काळ बंद करण्यात यावी, अन्यथा आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते, माजी जिप अध्यक्ष व बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तसेच बाजार समितीचे उपसभापती रविंद्रबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली वांगेपल्ली येथील सरपंच दिलीप मडावी, उपसरपंच राजेश कोतपल्लीवार, सदस्य संजय आत्राम, कल्पना मडावी, प्रियंका तोडसाम, निलेश आलाम, संतोष येरमे, महेश नैताम, बाबुराव नागपुरे, ईश्वर सिडाम व गावातील समस्त गावकऱ्यांनी या मार्गावरून जडवाहनांना ये-जा करण्यास बंदी असल्याचे फलकही लावले होते. संबंधितांनी याची दखल घेत दखल घेत या मार्गावरून जडवाहनांची वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे ग्रामस्थ व व्यापा-यांना दिलासा मिळाला आहे.