अल्पवयीन आदिवासी विद्यार्थीनीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक

अल्पवयीन आदिवासी विद्यार्थीनीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक
– आलापल्ली येथील घटना

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी शाळेत गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी विद्यार्थीवर दोन युवकांनी अत्याचार केल्याची घटना अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे. रोशन गोडसेलवार (23) रा. आलापल्ली व निहाल कुंभारे (24) रा. जीवनगट्टा, ता. एटापल्ली अशी आरोपींची नावे आहेत.
एटापल्ली तालुक्यातील रहिवासी असलेली पीडित मुलगी ही आलापल्ली येथील एका शाळेत शिक्षण घेत होती. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी शनिवारी ती शाळेत गेली होती. त्यानंतर ओळखीचा असलेल्या निहाल कुंभारे याने तिला मित्राच्या खोलीवर नेले. सायंकाळी रोशन गोडसेलवार व निहाल कुंभारे यांनी मुलीला बळजबरीने मद्य पाजून तिच्यावर अतिप्रसंग केला. रविवार, 11 जून रोजी पहाटेच्या सुमारास आरोपींनी तिला आलापल्ली येथील चौकात सोडून दिले. भेदरलेल्या मुलीने चौकात आपल्या घडलेल्या प्रसंगीची माहिती दिली. मात्र, काही नागरिकांनी तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला. एकाने तर तिला तुझीच बदनामी होईल, अशी भीती दाखवून घरी परत जाण्यास सांगितले. त्यानंतर ती एटापल्ली तालुक्यातील आपल्या स्वगावी परत आली. कुटूंबियांनी आपबिती सांगताच पीडित मुलीसह कुटूंबियांनी एटापल्ली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी पीडितेचे बयाण नोंदवून तपास अहेरी पोलिसांकडे वर्ग केला.
अहेरी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांचेवर बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यासह कलम 376 तसेच पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासदंर्भात तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक गुट्टे यांनी दोन्ही आरोपींना गडचिरोली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती दिली. पुढील तपास अहेरीचे पोलिस निरीक्षक मानभाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गुट्टे करीत आहेत.