डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी घटना ; विवाहित महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरची कारागृहात रवानगी

डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी घटना ; विवाहित महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरची कारागृहात रवानगी
-कुरखेडातील घटना

GADCHIROLI TODAY
कुरखेडा : उपचारासाठी आलेल्या विवाहित महिलेचा डॉक्टराने विनयभंग केल्याची संतापजनक व डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी घटना कुरखेडा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी कुरखेडा पोलिसांनी डॉक्टराला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे. डॉ. जिबन हिरा (28) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा तालुक्यातील ग्रामीण भागातील विवाहित महिला कुरखेडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकानजीक असलेल्या डॉ. जिबन हिरा यांच्या क्लिनिकीमध्ये येत होती. मागील पंधरा दिवसांपासून सदर महिलेवर उपचार सुरु होते. तपासणी दरम्यान आरोपी डॉ. जिबन हिरा महिलेशी अश्लील चाळे करीत होता. दरम्यान मंगळवारी दुपारी 3 वाजता सदर महिला परत तपासणीसाठी क्लिनीकला आली होती. मात्र यावेळी औषधोपचार न करता आरोपी डॉ. जिबन हिरा वाईट हेतूने छेड काढित महिलेचा विनयभंग केला. संतप्त महिलेसह तिच्या पतीने क्लिनिकमध्ये डॉक्टरला बेदम चोप दिला. त्यानंतर महिलेने कुरखेडा पोलिस ठाण्यात डॉक्टराविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी डॉक्टरवर गुन्हा दाखल करीत अटक केली. बुधवारी आरोपीस कुरखेडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची 14 दिवसांसाठी कारागृहात रवानगी केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक शितल माने करीत आहेत.