सिनेस्टाईल पाठलाग करून पकडला दारुसह 1.68 लाखाचा मुद्देमाल ; आरमोरी पोलिसांनी पाच आरोपींना केली अटक

सिनेस्टाईल पाठलाग करून पकडला दारुसह 1.68 लाखाचा मुद्देमाल
– आरमोरी पोलिसांनी पाच आरोपींना केली अटक

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : ब्रम्हपुरी तालुक्यातून आरमोरी शहराकडे देशी दारूची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या दोन दुचाकी वाहनांचा सिनेस्टाईल पाठलाग करून दारुसह 1 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास आरमोरी पोलिसांनी केली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. रवी दिलीप बावणे (23), मंगेश शिवराम कुथे (28), सुशांत मनोहर भर्रे (26)तिन्ही रा. बेलपातळी ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर, दीपक राहुल रामटेके (24) रा. जुनीपेठ आरमोरी व महेश कवडू कोल्हे(22) रा. नेहरू चौक आरमोरी असे आरोपींचे नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी बेलपातळी येथून सुशांत भर्रे हा इसम आपल्या माणसांच्या मदतीने दुचाकी वाहनाने गांगलवाडीकडून आरमोरीकडे देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती आरमोरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणेदार संदीप मंडलिक यांनी पोलिस उपनिरीक्षक संभाजी झिंझुर्डे, पोलिस नायक राजू उराडे, पोशि शैलेश तोरपकवार व चालक सहाय्यक फौजदार मगरे यांना सोबत घेऊन वैनगंगा नदीलगत असलेल्या रुद्रा हॉटेलजवळ रात्रीच्या सुमारास सापळा रचला. दरम्यान, संयशीत दोन दुचाकी भरधाव वेगाने येत असल्याचे पोलिसांना दिसताच त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, दारू तस्करांनी चकमा देत भरधाव वेगाने गाड्या नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा सिनेस्टॅइल पाठलाग करून दोन्ही दुचाकी चालकांना अरसोडा येथील नहराजवळ मोठ्या शिताफीने पकडले. एका दुचाकीतून 41 हजार 400 रुपये किंमतीची देशी दारू व 48 हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण 1 लाख 1 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल तर एमएच 33 झेड 1882 क्रमांकाच्या दुसऱ्या दुचाकीमधून 17 हजार रुपये किंमतीची दारू व 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरमोरी पोलिसांनी दोन्ही दुचाकींमधून एकूण 1 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच आरोपींना अटक केली. आरोपींना विचारणा केली असता, सदरचा माल हा ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलपातळी येथील इसम सुशांत मनोहर भर्रे यांचा असून आरमोरी येथील किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करण्याकरिता घेऊन जात असल्याचे पंचासमक्ष सांगितले. आरमोरी पोलिसांनी सदर वाहन व दारू जप्त केली असून आरोपीविरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल, उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात व पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक संभाजी झिंझुर्डे, पोना राजू उराडे, शैलेश तोरपकवार करीत आहेत.