‘या’ शहरात आढळले १० बाल मजुर ; पोलिस स्टेशनमध्ये नोंद

‘या’ शहरात आढळले १० बाल मजुर ; पोलिस स्टेशनमध्ये नोंद
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : स्थानिक स्पर्श संस्थेच्या पुढाकाराने जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा पोलीस दल आणि चाईल्डलाईन सोबत राबविलेल्या संयुक्त अभियानात देसाईगंज शहरातील १० बालकामगारांची सुटका करण्यात आली.
स्पर्श संस्था यंदाचा जून महिना बालमजुरीविरुद्ध कृती महिना म्हणून साजरा करत आहे. या अंतर्गत बालकांची बालमजुरी आणि गुलामगिरीच्या तावडीतून सुटका करण्यासाठी महिनाभर छापे टाकून बचाव कार्य केले जाणार आहे. देसाईगंज वडसा येथून सुटका करण्यात आलेल्या बालकामगारापैकी बहुतेक मुले
अल्पवयीन असून काही मुले दुसऱ्या राज्यातील आहेत. या प्रकरणी पोलीस स्टेशन देसाईगंज येथे नोंद घेण्यात आली आहे.
जिल्हा बाल संरक्षण कक्ष व कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन फौंडेशनच्या मदतीने गडचिरोली जिल्ह्याला बालकामगार मुक्त करण्यासाठी कठोर परिश्रम सुरु आहेत. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, स्पर्शचे प्रकल्प व्यवस्थापक इतिहास मेश्राम, क्षेत्र समन्वयक लुकेश सोमनकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कवीश्वर लेनगुरे, जयंत जथाडे, रवींद्र बंडावार, चाईल्ड लाईनचे देवेंद्र मेश्राम, पोलीस स्टेशन देसाईगंजचे काँस्टेबल विलास बालमवार, सतीश ठाकरे आदींनी अथक परिश्रम घेतले.

बालमजुरीबाबत भारतातील परिस्थिती अतिशय गंभीर असून २०११ च्या जनगणनेनुसार भारतात ५ ते १४ वयोगटातील १ कोटी १० लक्ष बाल मजूर आहेत. देशातील एकूण मुलांच्या संख्येच्या हे प्रमाण ३.९ टक्के आहे. आज आपल्या देशात बालमजुरी निर्मूलनासाठी अनेक प्रभावी धोरणे आणि कठोर कायदे आहेत. पण जोपर्यंत संपूर्ण समाज जबाबदारी घेऊन आपले काम करणार नाही, तोपर्यंत हे आव्हानच राहणार आहे.
-डॉ. दिलीप बारसागडे, अध्यक्ष, स्पर्श संस्था