अनाधिकृत एचटीबीटी बियाणे विक्रेत्यांवर होणार गुन्हा दाखल ; कृषी विभाग लक्ष ठेवून

अनाधिकृत एचटीबीटी बियाणे विक्रेत्यांवर होणार गुन्हा दाखल
-अनाधिकृत बियाणे खरेदी करू नका : मास्तोळी

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्ह्यातील बाजारात बोगस बियाणे खाजगी व्यक्ती मार्फत चोरट्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एचटीबीटी बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभाग नजर ठेवून आहे. सदर विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लागवडीसाठी एचटीबीटी (चोर बीटी) बियाणे खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.
शासनाची कोणतीही मान्यता नाही अशा प्रकारचे अवैध बियाणे विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. या प्रकारचे लागवड केलेल्या कापूस पिकाची पाने व कापसाचे नमुने तपसणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे. यात एचटीबीटी आढळून आल्यास संबंधितावर कार्यवाही करण्यात येणार आहे. एचटीबीटी लागवड केल्याने जामिनाचा ऱ्हास होऊन जमिनी कालंतराने नापीक होते. मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो. तरी शेतकऱ्यांनी अधिकृत कापूस बियाणे लागवड करावे. एखाद्या व्यक्तीकडे अनाधिकृत एचटी बियाणे आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली आहे.
कारवाईसाठी टीम सज्ज
एचटीबीटी बियाणे विक्री करणाऱ्या लोकांवर कृषी विभाग लक्ष ठेवून असून आम्ही टीम ऍक्टिव्ह केली आहे. आष्टी परिसर व आजूबाजूच्या परिसरात स्वतः लक्ष देऊन आहोत. संशयित ठिकाणच्या झडती घेणे सुरु आहे. शक्य तिथे पोलीस विभागाची मदत घेतली जात आहे, असे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांनी सांगितले.