खळबळजनक । अपहरणाचा प्रयत्न फसला ; दोन अल्पवयीन अटकेत तर सात फरार

खळबळजनक । अपहरणाचा प्रयत्न फसला ; दोन अल्पवयीन अटकेत तर सात फरार
-मुडझा येथील घटना
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जुन्या क्षूल्लक वादातून गुरुवारी रात्रीच्या सुमारास काही युवकांनी शहरापासून जवळच असलेल्या मुडझा येथील एका युवकाचा अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी दोन अल्पवयीन बालकांना अटक केली आहे. तर आणखी सात आरोपी फरार असल्याची माहिती आहे. फरार आरोपींमध्ये राजेंद्र ऊर्फ गोलू संपन मंडल रा. कुनघाडा ता. चामोर्शी, नकुल भोयर रा. चामोर्शी, मुस्तफा पठाण रा. कुनघाडा या तीन आरोपींचा समावेश आहे. उर्वरीत आरोपींची उशिरापर्यत नावे कळू शकली नाहीत.
सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली शहरापासून जवळच असलेल्या मुडझा येथील समीर चौधरी या युवकासोबत कुनघाडा येथील अल्पवयीन मुलाचा जुना वाद होता. या कारणातूनच गुरुवारी रात्रीच्या सुमारास मोबाईलवरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. या विवादातून अल्पवयीन आरोपीने समीरचे अपहरण करण्याची धमकी दिली. दरम्यान गुरुवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास 9 आरोपी वाहनात बसून मुडझा येथे पोहचले. गावात पोहचून त्यांनी समीरचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, अपहरण करण्यासाठी आलेल्या 9 आरोपींपैकी एका अल्पवयीन आरोपीस ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने पकडले. घटनेची माहिती तत्काळ गडचिरोली पोलिसांना देताच पोलिसांनी तत्परता दाखवित घटनास्थळ गाठले. घटनेची संपूर्ण माहिती घेत पोलिसांनी दुस-या अल्पवयीन बालकासही तत्काळ अटक केली. दोन्ही आरोपी बालकांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करीत त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उर्वरीत आरोपींचा शोध सुरु असून पुढील तपास ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक तोटेवार करीत आहेत.