लाच रक्कम स्वीकारणारा वनरक्षक अडकला जाळ्यात

लाच रक्कम स्वीकारणारा वनरक्षक अडकला जाळ्यात

GADCHIROLI TODAY

-एटापल्ली येथे एसीबीची कारवाई
गडचिरोली : रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यासाठी लाच रक्कम स्वीकारणे वनरक्षकास चांगलेच महागात पडले आहे. प्राप्त तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून एटापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील वनरक्षकास १५ हजारांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली आहे. धनीराम अंताराम पोरेटी (३३) असे लाचखोर वनरक्षकाचे नाव आहे.
वनरक्षक धनीराम पोरेटी यांनी नदीतील रेतीची वाहतूक करीत असलेले दोन ट्रॅक्टर एटापल्ली नाक्याजवळ पकडून कोणतीही कायदेशीर कारवाई न करता सोडून देण्यासाठी ३० हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली. तडजोडीअंती १५ हजार रुपये लाच रक्कम तक्रारदार यांच्या सेतू दुकानात स्वीकारताना वनरक्षक रंगेहाथ मिळून आला. याप्रकरणी एटापल्ली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, पोहवा नथ्थू धोटे, नापोशी राजेश पदमगिरवार, स्वप्नील बांबोळे, पोशि किशोर ठाकूर, संदीप घोरमोडे, संदीप उडान व चापोहवा अंगडवार यांनी केली.