फाशी द्या..फाशी द्या..आरोपींना फाशी द्या ; अहेरी व आलापल्लीत निघाली निषेध रॅली

फाशी द्या..फाशी द्या..आरोपींना फाशी द्या ; अहेरी व आलापल्लीत निघाली निषेध रॅली
-आदिवासी विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरण
GADCHIROLI TODAY

गडचिरोली : 10 जून रोजी आलापल्ली शहरात एटापल्ली येथील आदिवासी अल्पवयीन विद्यार्थिनीवर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी रविवारी अहेरी आणि आलापल्ली शहरात आदिवासी संघटनांतर्फे निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी आरोपींना फाशी द्या, अशा घोषणा देत पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
एटापल्ली येथील आदिवासी अल्पवयीन विद्यार्थिनी आपली गुणपत्रिका काढण्यासाठी १० जून रोजी आलापल्ली येथे पोहोचली होती. तेव्हा निहाल कुंभारे आणि रोशन गोडसेलवार यांनी अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केले. तसेच दुसऱ्या दिवशी पीडितेला आलापल्लीच्या चौकात सोडण्यात आले. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर अहेरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून कारागृहात रवानगी केली. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रविवारी अहेरी व आलापल्ली शहरात आदिवासी संघटनांतर्फे निषेध रॅली काढून आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. अहेरी येथे काढण्यात आलेल्या रॅलीत जिप च्या माजी अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व अहेरीतील नागरिक उपस्थित होते. दुसरीकडे आलापल्ली शहरात काढण्यात आलेल्या रॅलीत आलापल्ली व नागेपल्ली गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर पोलिस विभागाला निवेदन देण्यात आले.