पोलिस भरतीत खेळाचेही बनावट प्रमाणपत्र ! ; गडचिरोली पोलिसांकडून चौकशी सुरु

पोलिस भरतीत खेळाचेही बनावट प्रमाणपत्र ! ; गडचिरोली पोलिसांकडून चौकशी सुरु

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्हा पोलिस भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले होते. याचे राज्यभर मोठे रॅकेट उघडकीस आल्यानंतर आता खेळाचेही बनावट प्रमाणपत्र देऊन लाभ घेतल्याची माहिती आहे. त्याअनुषंगाने नवप्रविष्ट 15 पोलिसांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी सुरु आहे.
जिल्हा पोलिस दलातच चार महिन्यांपूर्वी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण 348 जागांसाठीच्या या भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांच्या कोट्यातून नियुक्ती मिळवली होती. मात्र, हे उमेदवार व त्यांचे कुटूंबिय वर्षानुवर्षे गडचिरोलीचे रहिवासी असताना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मात्र बीड येथील असल्याने ते नियमबाह्य असल्याचा दावा एका निनावी पत्राद्वारे केला होता. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना हे निनावी पत्र प्राप्त झाले होते. या पत्राच्या आधारे चौकशी केली असता, बनावट प्रमाणपत्र देत नोकरीचा लाभ घेतल्याच्या आरोपावरून दोन नवप्रविष्ट पोलिसांसह नियुक्तीच्या प्रतीक्षेतील एकास अटक झाली होती. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी बनावट प्रमाणपत्र सादर करुन भरती झालेल्या उमेदवारांचे तसेच हे प्रमाणपत्र मिळवून देणा-या रॅकेटमधील लोकांचे अटकसत्र राबविले होते. आता खेळाचे बनावट प्रमाणपत्र देऊन पोलिस दलात भरती झालेले उमेदवारदेखील चौकशीच्या रडारवर आले आहेत. खेळाचे बनावट प्रमाणपत्र देऊन त्यांनी खेळाडू कोट्यातून भरतीचा लाभ घेतल्याची शंका आहे. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरु आहे. याबाबत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना संपर्क केला असता, त्यांनी दुजोरा दिला. चौकशी पूर्ण झाल्यावरच यातील तथ्य समोर येईल.
दस्ताऐवजांची पडताळणी सुरु
जिल्हा पोलिस दलात खेळाडूंसाठी 5 टक्के जागा आरक्षित आहेत. याद्वारे जवळपास 15 जणांची निवड झालेली आहे. ते सध्या खात्यात रूजू असून प्रशिक्षण सुरु आहे. मात्र भरती होताना सादर केलेल्या खेळाच्या प्रमाणपत्रावरुन शंका निर्माण झाल्याने या आरक्षणाचा लाभ घेतलेले सर्वच उमदेवारांच्या दस्ताऐवजांची पडताळणी सुरु असल्याची माहिती आहे.