दोन गोवंश तस्करांना अटक ; मुलचेरा पोलिसांची कारवाई

दोन गोवंश तस्करांना अटक ; मुलचेरा पोलिसांची कारवाई

GADCHIROLI TODAY
मुलचेरा : तालुक्यातील कोपरल्ली गावातून तेलंगणा राज्याकडे कत्तलीसाठी नेणाऱ्या गोवंशाची सुटका करण्यात मुलचेरा पोलिसांना यश आले. याप्रकरणी १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत दोघांना अटक करण्यात आली आहे. शेख बाबा मनोद्दीन रा. धर्माराम, जि. करिमनगर (तेलंगणा) व केशव रामदास दुर्गे रा. मल्लेरा, ता. मुलचेरा असे आरोपींचे नावे आहेत.
मुलचेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोपरल्ली गावामधून तेलंगणा राज्यातील काही लोक गाय व बैलाची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती मूलचेरा पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शेख बाबा मनोद्दीन व केशव रामदास दुर्गे या दोघांना पकडून चौकशी केली असता, मुलचेरा तालुक्यातील कोपरअल्ली गावातून गाय व बैलाची तस्करी करून विश्वनाथनगरकडे नेत असल्याची माहिती पुढे आली. या कारवाईत दोन पांढऱ्या रंगाचे बैल किंमत ४0 हजार, एक धामन्या रंगाचा बैल किंमत १५ हजार, ज्युपिटर मोटर सायकल किंमत ६० हजार असा एकंदरीत १ लाख १५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मूलचेरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी अशोक भापकर करीत आहेत.