भीषण अपघातात गडचिरोलीतील प्रसिद्ध पेंटरचा मृत्यू

भीषण अपघातात गडचिरोलीतील प्रसिद्ध पेंटरचा मृत्यू
-पत्नी जखमी

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : अमरावती-नागपूर महामार्गावरील कोंढाळीजवळ झालेल्या कारच्या भीषण अपघातात गडचिरोली शहरातील प्रसिद्ध पेंटरचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची दुःखद घटना रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. युवराज व्यंकटी बेहरे (५०) असे मृतकाचे नाव असून पत्नी विभा युवराज बेहरे रा. कन्नमवार वॉर्ड, गडचिरोली या जखमी आहेत.
प्राप्त माहितीनुसार, युवराज व्यंकटी बेहरे हे पत्नी विभा बेहरे व मुलांसह चार दिवसांपूर्वी आपल्या कारने महाबळेश्वर या ठिकाणी गेले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास परत गडचिरोलीकडे येत असताना त्यांचा अमरावती-नागपूर महामार्गावरील कोंढाळी गावाजवळ अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या पती-पत्नीस उपचारार्थ नागपूरच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, युवराज बेहरे यांचा मृत्यू झाला. सुदैवाने त्यांची मुले ही मागच्या कारमध्ये असल्याची माहिती असून ते सुखरूप आहेत. युवराज बेहरे हे गेल्या २० वर्षांपासून गडचिरोली शहरात पेंटर म्हणून काम करत होते. ते सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटनातर्फे आयोजित कार्यक्रमात सुरेख रांगोळी काढत असल्याने ते सर्वांच्याच परिचयाचे होते. युवराज बेहरे अंत्यत मनमिळावू, प्रेमळ व्यक्ती असल्याने सर्वांचे ते आवडते होते. त्यांच्या अपघाती निधनाने गडचिरोली शहरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.