खांबावर चढून दुरुस्तीचे काम करतेवेळी लाईनमनचा मृत्यू

खांबावर चढून दुरुस्तीचे काम करतेवेळी लाईनमनचा मृत्यू

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : खांबावर चढून दुरुस्तीचे काम करीत असताना वीज सुरु झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसल्याने लाईनमनचा खांबावरच मृत्यू झाल्याची घटना आज तालुक्यातील येवली सर्कलमधील दर्शनी माल येथे घडली. वैभव जेंगठे (22) रा. मंगरमेंढा ता. ब्रम्हपुरी असे मृतक लाईनमनचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, वैभव जेंगठे हा लाईनमन येवली सर्कलमधील दर्शनी माल येथे आज सकाळी वीज दुरुस्तीचे काम करण्यासाठी विद्युत खांबावर चढला. दरम्यान, दुरुस्तीचे काम सुरु असतानाच अचानक वीज सुरु झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यात त्याचा खांबावरच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, वैभव हा खांबावर चढून वीज दुरुस्ती करीत असताना वीज सुरुच असल्याची माहिती आहे. त्यामुळे थोड्याशा चुकीमुळे त्याला आपला नाहक जीव गमवावा लागल्याची चर्चा गावात सुरु आहे. घटनेची माहिती महावितरण व पोलिस विभागाला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह खांबावरून खाली उतरविला व शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. अधिक तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.