लोह वाहतुकीमुळे त्रस्त स्थानिकांचा एसडीपीओ कार्यालयावर धडक मोर्चा ; या मागण्यांना घेऊन लोक उतरले रस्त्यावर

लोह वाहतुकीमुळे त्रस्त स्थानिकांचा एसडीपीओ कार्यालयावर धडक मोर्चा ; या मागण्यांना घेऊन लोक उतरले रस्त्यावर

GADCHIROLI TODAY
एटापल्ली : तालुक्यातील सुरजागड पहाडीवरील लोहखनिज उत्खननाविरोधात तालका अन्याय विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज, 19 जून रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवित या मोर्चात स्थानिकांसह व्यापारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाला आदिवासी विद्यार्थी संघ तसेच भाजपाने पाठिंबा दर्शविला.
सुरजागड पहाडीवरील उत्खनन व वाहतूकीमुळे आदिवासींमध्ये तीव्र नाराजी आहे. स्थानिकांनाही याची झळ बसत आली आहे. बिनबोभाट वाहतूक, या वाहतूकीतून वाढलेले अपघात, धुळ, प्रदुषण, रस्त्यालगच्या पिकांची प्रचंड हानी, रस्त्यांची दयनीय स्थिती आदी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शिवाय लोहाखनिजासाठी सातत्याने स्फोट घडवून आणले जात आहे. या प्रकल्पामुळे जलस्त्रोत आटू लागले असून पाणी टंचाईचा धोका वाढल्याचा आरोप आहे. या विरोधात एटापल्ली तालुका अन्याय विरोधी संघर्ष समितीने बंदची हाक दिली होती. यास स्थानिक व्यापारी तसेच नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. आज, सोमवारी शहरात कडकडीत बंद पाळून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला प्रारंभ करीत मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता यांना सादर करण्यात आले. याप्रसंगी उपअधीक्षक डॉ. सुदर्शन राठोड उपस्थित होते.
प्रकल्पात 80 टक्के स्थानिक तरुणांना रोजगार देण्यात यावा, लोहवाहतूकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग करावा, तोपर्यंत रस्त्याची वाहतूक बंद ठेवावी, जलपातळी वाढविण्यासाठी बंधारे बांधावे, सर्वसुविधायुक्त दवाखाना उभारण्यात यावा, रॉयल्टीपोटी मिळणा-या 75 टक्के निधीतून तालुक्यात विकासकामे करावीत, बसेसची संख्या वाढवून दळणवळण सुखकर करावे, आलापल्ली ते चोखेवाडा रस्त्याचे काम करावे, यापूर्वी कंपनीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, आदी मागण्यांना घेऊन सदर आंदोलन पुकारण्यात आले. या मागण्यांवर येत्या 20 दिवसात योग्य निर्णय न घेतल्यास बेमुदत चक्काजाम छेडण्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
या आंदोलनात व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश पुल्लूरवार, माजी जिप अध्यक्ष तथा आविसंचे अजय कंकडालवार, भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष व भाजपचे प्रदेश सदस्य संदीप कोरेत, भाजपा तालुकाध्यक्ष विजय नल्लावार, तालुका उपाध्यक्ष खेडेकर, मधूकर पुल्लूरवार, मनिमोहन मंडल, गणेश खेडेकर, प्रकभाकर कामळे आदींसह परिसरातील महिला, पुरुष, व्यापारी बहूसंख्येने उपस्थित होते.