पोलिस भरतीसाठी जोडलेल्या क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी सुरू ; 6 प्रशिक्षणार्थी जवानांना बोलावले परत

पोलिस भरतीसाठी जोडलेल्या क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी सुरू ; 6 प्रशिक्षणार्थी जवानांना बोलावले परत

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मागील वर्षी पार पडलेली पोलिस भरती चर्चेचा विषय ठरत आली आहे. काही दिवसांपूर्वीच बनावट प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र जोडल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी पोलिस उमेदवारांसह काही जणांना अटक करण्यात आली असतांनाच याच पोलिस भरती प्रक्रियेत सहा उमेदवारांनी जोडलेले क्रीडा प्रमाणपत्र अवैध असल्याचे संशय असून जालना येथे प्रशिक्षण घेत असलेल्या 6 प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांना परत बोलाविण्यात आले आहे. या प्रकरणामुळे बनावट व अवैध प्रमाणपत्र जोडून नोकरी बळकावणाऱ्या उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे.
काही महिन्यांपूर्वी गडचिरोली जिल्हा पोलिस दलात भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र जोडून नोकरी बळकावल्याचे प्रकरण उघडकीस येताच जिल्हा पोलिसांनी अटकसत्र सुरु केले होते. राज्यातील विविध ठिकाणी छापे टाकून या प्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस आणले होते. हे प्रकरण ताजे असतानाच या भरतीमध्ये बनावट क्रीडा प्रमाणपत्र जोडून नोकरी मिळविल्याची बाब पुढे आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक कार्यालयाला निर्गमित करण्यात आले. याअंतर्गत पोलिस प्रशिक्षण घेणाऱ्या 6 पोलिस जवानांना परत बोलाविण्यात आले. आधी प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र त्यानंतर अवैध क्रीडा प्रमाणपत्राच्या नवीन प्रकरणामुळे पोलिस कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मागील वर्षी जिल्हा पोलिस दलाकडून भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये 40 उमेदवारांनी कराटे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जोडले होते. त्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया यशस्वी झाल्याने संबंधित 6 उमेदवारांची जिल्हा पोलिस दलात नियुक्ती करण्यात आली. त्यांना पोलिस प्रशिक्षणासाठी जालना येथे पाठवण्यात आले. मात्र संबंधित नियुक्त पोलिस कर्मचाऱ्यांनी भरतीदरम्यान जोडलेले कराटे प्रमाणपत्र अवैध असून ते महाराष्ट्र कराटे असोसिएशनशी निगडीत नाही. त्यामुळे आयुक्तांकडून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे.
प्रकरणाचा तपास सुरु : एसपी नीलोत्पल
मागीलवर्षी निघालेल्या पोलिस भरतीत 40 उमेदवारांनी कराटे प्रमाणपत्र जोडले होते. उमेदवारांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्र कराटे असोसिएशनने संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी जोडलेले कराटे प्रमाणपत्र असोसिएशनशी संबंधित नसून ते अवैध असल्याचे म्हटले आहे. याबाबतचे पत्र आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे. त्यामुळे पोलिस प्रशिक्षणासाठी गेलेल्या सदर जवानांना परत बोलावण्यात आले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी जोडलेले प्रमाणपत्र बनावट म्हणता येणार नाही. मात्र यासंदर्भात तपासणी सुरू केल्यानंतर प्रमाणपत्रे बनावट असल्याचे आढळून आल्यास निश्चितच कारवाई केली जाईल.
नीलोत्पल, जिल्हा पोलिस अधीक्षक, गडचिरोली