शाळेची घंटा वाजूनही बसचा पत्ताच नाही ; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर मांडला ठिय्या

शाळेची घंटा वाजूनही बसचा पत्ताच नाही ; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर मांडला ठिय्या
– कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले नेतृत्व

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : शाळेच्या पहिल्याच दिवशी आष्टी-आलापल्ली मार्गावर एकही बस धावत नसल्याने कॉंग्रेस पदाधिका-यांच्या नेतृत्वात शालेय विद्यार्थ्यांनी चक्क रस्त्यावर उतरित सुभाषनगर येथे रास्ता रोको आंदोलन पुकारले.
सुरजागड लोहखाणीतून लांब पल्याच्या ट्रकमधून लोहखनिजाची वाहतूक करण्यात येत असल्याने आष्टी-आलापल्ली मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाने या मार्गावरुन धावणा-या बसेस बंद केल्या आहेत. परिणामी आज शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना फटका बसला. यामुळे संतप्त विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी अहेरी तालुका कॉंग्रेसच्या वतीने कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाउे यांच्या नेतृत्वात सुभाषग्राम येथे रास्ता रोको आंदोलन पुकारले. कॉंग्रेस पदाधिकारी व विद्यार्थ्यांच्या चक्काजाम आंदोलनामुळे काही काळ आलापल्ली-आष्टी मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. यादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विद्यार्थ्यांनी मुख्य रस्त्यावर धरणे आंदोलन पुकारल्याची माहिती मिळताच अहेरीचे तहसिलदार फारुख शेख, ठाणेदार किशोर मानभाव, अहेरी आगाराचे व्यवस्थापक जितेंद्र राजवैद्य यांनी आंदोलनस्थळ गाठले. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. चर्चेदरम्यान संबंधित अधिकांनी सोमवारपासून नियमित बससेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले.सोमपवारपर्यंत बस सुरु न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत आंदोलनकर्त्यांनी तात्पूरता आंदोलन मागे घेतले.
आज, 30 जूनपासून शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे. भाजप सरकार बेटी ‘बचाव-बेटी पढाव’च्या गोष्टी करतात, मात्र त्याच मुलींना चांगले शिक्षण द्यायचे झाल्यास भाजप काढता पाय घेत असल्याचे ताशेरे कॉंग्रेस पदाधिका-यांनी शासन, प्रशासनावर ओढले. येत्या 5 जुलै रोजी राष्ट्रपती जिल्ह्यात दाखल होणार आहे. या दौ-यावर शासन व प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. तर दुसरीकडे मात्र बसअभावी अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत, याकडे शासन, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही कॉंग्रेस पदाधिका-यांनी केला.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, तालुध्यक्ष डॉ. निसार (पप्पू) हकीम, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष रजाक पठाण, उपाध्यक्ष राघोबा गौरकर, आदिवासी सेल तालुकाध्यक्ष मधुकर शेडमेक, किसान सेल तालुकाध्यक्ष नामदेव आत्राम, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष हनिफ शेख, गणेश उप्पलवार, रुपेश बंदेला, दिनकर हुलके, देशमुख, पोरेडीवार, बेबीताई कुत्तरमारे यांचेसह शेकडोच्या संख्येने विद्यार्थी, पालक, महिला, काँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते.