नदीत उडी घेतलेल्या पोलीस युवतीचा आढळला मृतदेह ; प्रेमातून आलेल्या नैराश्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप

नदीत उडी घेतलेल्या पोलीस युवतीचा आढळला मृतदेह ; प्रेमातून आलेल्या नैराश्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप

GADCHIROLI TODAY
आरमोरी : नजीकच्या वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी घेणाऱ्या शारदा नामदेव खोब्रागडे या पोलीस शिपाई तरुणीचा मृतदेह पुलापासून काही अंतरावर शोधमोहिमेत रात्री ९.३० वाजताच्या सुमारास आढळला. याप्रकरणी मृतक युवतीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार करीत प्रेमातून आलेल्या नैराश्यामुळे तिने आत्महत्या केली असून यास तिचा प्रियकर जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथील रहिवासी असलेली शारदा भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशनला कार्यरत होती. ती अविवाहित असून सोबत काम करणाऱ्या एका सहकाऱ्याचे तिच्यावर प्रेम होते. परंतू त्या सहकाऱ्याच्या वागणुकीमुळे ती अस्वस्थ झाली होती. त्यातून तिला नैराश्य आले होते. त्यामुळे शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीवरील पुलावर तिने दुचाकी आणि मोबाईल ठेवून नदीत उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक, तहसील कार्यालयाचे बचाव पथक आणि स्थानिक ढिवर बांधवांच्या मदतीने शोधमोहिम राबवण्यात आली. दरम्यान, रात्री ९.३० वाजताच्या सुमारास शारदाचा मृतदेह पुलापासून काही अंतरावर आढळला. शारदाशी संबंधित प्रेम प्रकरणाची आणि त्यातून तिला आलेल्या मानसिक तणावाची माहिती तिच्या कुटुंबियांनाही होती. त्यामुळे त्यांनी शारदाच्या प्रियकराविरूद्ध तक्रार देत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.