‘या’ कालावधीत सिरोंचा-आलापल्ली मार्ग जड वाहनांसाठी बंद : प्रवासासाठी जाणून घ्या पर्यायी मार्ग

‘या’ कालावधीत सिरोंचा-आलापल्ली मार्ग जड वाहनांसाठी बंद : प्रवासासाठी जाणून घ्या पर्यायी मार्ग

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 सी वरील सिरोंचा ते आलापल्ली मार्गाची सद्यस्थितीत फारच दूरवस्था झाली आहे. त्यातच या मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारे काम सुरु असल्याने सदर मार्गावर 5 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत जड वाहनांसाठी बंदी घालण्यात आली आहे. सदर कालावधीत पर्यायी मार्ग म्हणून सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर येणाऱ्या वाहनांकरिता सिरोंचा-मंचेरियाल-राजुरा – बल्लारशाह-चंद्रपूर-गडचिरोली असेल तर आलापल्ली हून मंचेरियाल मार्गे जाणाऱ्या वाहनांसाठी आलापल्ली-आष्टी- बल्लारपूर-मंचेरियाल या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 सी वरील सिरोंचा ते रेपनपल्ली (59 किमी) व रेपनपल्ली ते गुड्डीगुड्डम (19 किमी) या मार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे सुरु आहे. सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वर्दळ आहे. त्यामुळे सदर मार्ग जड वाहतुकीस पावसाळ्यात योग्य नसल्याने या मार्गावरील जड वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळती करण्याची विनंती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांनी केली होती. सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर सातत्याने सुरु असलेल्या जड वाहतुकीमुळे व निर्माणाधिन महामार्गाच्या कामामुळे पावसाळ्यात मार्गावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आलापल्ली ते सिरोंचा मार्गावर दोन्ही बाजुने सर्व प्रकारचे जड वाहनांची वाहतुक 5 जुलैच्या मध्यरात्री ते 30 सप्टेंबरच्या रात्री 11.59 वाजतापर्यंत बंद करण्यात आली आहे. या कालावधीत केवळ प्रवासी बसेस, पाणीपुरवठा, महावितरण, दूरसंचार, रस्ते दुरुस्ती संदर्भातील वाहनांना या मार्गाने प्रवास करता येईल.
मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 115 व 116 चे तंतोतंत पालन करावे. वाहतुकीस अयोग्य रस्ता वा पूल बिना बॅरेकेड्स वा योग्य काळजी न घेता खुले ठेवल्यास सदर मार्गावर अपघात झाल्यास संबंधित विभागप्रमुख तसेच संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. तसेच सदर आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या कोणत्याही वाहतुकदारास वा व्यक्तीविरुद्ध भारतीय दंडसंहिता 1860, महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 तसेच प्रचलित नियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलिसांना आहेत.