चाकू भोसकून सहकारी जवानाची हत्या ; आरोपी एसआरपीएफ जवानास पोलिस कोठडी

चाकू भोसकून सहकारी जवानाची हत्या ; आरोपी एसआरपीएफ जवानास पोलिस कोठडी

-विसोरा कॅम्पमधील घटना
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या कॅम्पमध्ये तैनात दोन जवानांमध्ये झालेले भांडण विकोपाला गेल्याने एका जवानाने आपल्या सहकारी जवानाची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना ३ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली. सुरेश मोतीलाल राठोड (३०) असे मृतकाचे नाव असून मारोती संभाजी सातपुते (३३) असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, विसोरा येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या कॅम्पमध्ये तैनात सुरेश मोतीलाल राठोड व मारोती संभाजी सातपुते या दोन जवानांमध्ये रात्रीच्या सुमारास भांडण झाले. यावेळी मारोती सातपुते या जवानाने रागाच्या भरात सुरेश राठोडवर चाकूने हल्ला केला. यात सुरेश राठोडचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीस न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास देसाईगंज पोलिस करीत आहेत.