निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा ; आता दीड हजाराचे अनुदान

निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा ; आता दीड हजाराचे अनुदान
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : राज्य शासनाने 2023-24 अर्थसंकल्पात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या अनुदान रकमेत वाढ करण्याची महत्वपूर्ण घोषणा केली होती. या घोषणेनुसार 28 जून 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निराधार योजनेच्या अनुदानात 500 रुपयांची वाढ करण्यासं मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. सदर शासन निर्णय 5 जुलै रोजी निर्गमित करण्यात आला असून जिल्ह्यातील हजारो पात्र लाभार्थ्यांना आता महिन्याला 1500 हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ पेंशन योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना यापूर्वी 1 हजार रुपये प्रति महिना एवढी पेंशन मिळत होती. त्यामुळे निवृत्ती वेतन योजनेच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी लोकप्रतीनिधी व स्वयंसेवी संस्थांनी केली होती. त्या अनुषंगाने शासनाने मागील अर्थसंकल्पात सदरील योजनेतील पात्र लाभार्थींच्या अर्थसहाय्यात पाचशे रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शासन निर्णय निर्गमित झालेला नव्हते. दरम्यान 5 जुलै रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. यानुसार आता संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना आता प्रति महिना 1,500 रुपये एवढी पेंशन देण्यात येणार आहे.
सदरील अर्थसाहाय्य योजना ही संजय गांधी निराधार, श्रावण बाळ सेवा, इंदिरा गांधी वृद्धपकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा व राष्ट्रीय दिव्यांग योजना या योजनेतील सर्व लाभार्थीना लागू असणार आहे. यासोबतच शासन निर्णयानुसार या योजनेसाठी आवश्यक असलेल्या ह्यात प्रमाणपत्रबाबातच्या तरतूदीत देखील बदल करण्यात आला आहे. यानुसार आता त्याच आर्थिक वर्षात जर लाभार्थ्याने ह्यात प्रमाणपत्र दाखल केले तर लाभार्थ्यांची बंद केलेली पेंशन पुन्हा एकदा पूर्ववत होणार आहे.